मी कुणाला घाबरत नाही, कारण मी कधी चुकीचे काम करत नाही!

0

समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे प्रतिपादन

सांगवी : मी सर्वसामान्य कुटुंबात वाढलोय. इतरांसारखा गुंठामंत्री किंवा वारसाने झालेला राजकारणी नाही. मी आज मंत्री असलो तरी, आजही मी झोपडपट्टीत राहतो. मी कुणाला घाबरत नाही. कारण मी कधी चुकीचे काम करत नाही. मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. जुनी सांगवी येथे दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जागेच्या निकालाबाबत विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री कांबळे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या मेळाव्याप्रसंगी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसेना शहरप्रमुख, राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, संस्था अध्यक्ष बापुसाहेब सुवासे, गिरीश काटे, शरद थोरवडे, हाजीभाई शेख, रमेश गायकवाड, अरविंद ओव्हाळ, बाळासाहेब जावीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित सुवासे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवाळे गार्डन, जुनी सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या बाजुने निकाल
गेल्या 27 वर्षांपासून दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेचा सुमारे नऊ एकर जमिनीचा न्यायालयीन लढा सुरू होता. त्यात सर्वसामान्यांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने जुनी सांगवी येथे संस्था सभासद व समाज बांधवांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिलीप कांबळे पुढे म्हणाले, न्यायालयाचा निकाल सर्वसामान्य जनतेच्या बाजुने लागल्याने गोरगरीब कष्टकरी बांधवांना हक्काचे घर मिळणार आहे. दोन तपाच्या प्रदीर्घ लढ्यात अनेकांना वाटत होते ती जागा आपल्याला मिळावी. मात्र, न्यायव्यवस्थेने कष्टकर्‍यांच्या बाजुने कौल दिल्याने गोरगरीबांना न्याय मिळाला आहे. लवकरच याचे भूमिपूजन करून आगामी वर्षअखेरपर्यंत घराच्या चाव्या समाज बांधवांच्या हाती येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेची घेतली फिरकी
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आपल्या भाषणादरम्यान सत्तेत असणार्‍या शिवसेना मित्र पक्षाचीही फिरकी घेतली. ते म्हणाले, तिकडे गुंठामंत्री खूप आहेत. माझ्या पक्षात याचे प्रमाण कमी आहे, असे त्यांनी सांगितले. भाषणात कांबळे यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्राम वैद्य यांनी केले. तर आभार बापुसाहेब सुवासे यांनी मानले.