मी तुमच्यासाठी 24 X 7 उपलब्ध, पंतप्रधानांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

0

नवी दिल्ली : करोना लॉकडाऊन दरम्यान शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्यांकडून सूचनाही मागवल्या. मी तुमच्यासाठी २४ X ७ उपलब्ध असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

करोना फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज १८ वा दिवस आहे. उल्लेखनीय म्हणजे, देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहचली आहे.

लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार!

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याचे कळते. राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबतच पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे सात हजाराच्या पुढे गेली असून यातील जवळपास २० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. या आकडेवारीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातला लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन देखील त्यांनी केलं.