नवी दिल्ली : ‘मी देशद्रोही नाही, देशभक्त आहे आणि हे मला ओरडून आणि गाजावाजा करून सांगण्याची गरज वाटत नाही,’ अशा शब्दांत नसिरुद्दीन शहा यांनी टीकाकारांना सुनावले आहे. देशातील परिस्थिती बघून मला माझ्या मुलांची काळजी वाटते, असं विधान केल्यानंतर वादात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी टीकाकारांवर निशाना साधला आहे.
अजमेरपासून काही अंतरावर असलेल्या पुष्करमधील एका खासगी कार्यक्रमात नसिरुद्दीन शहा यांच्या ‘नसीर की नजीर फिर एक दिन’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. रविवारी अजमेरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शहा यांच्या या पुस्तक प्रकाशनाचा व्हिडिओ जारी करण्यात आला. भारत माझी मातृभूमी आहे. मी देशद्रोही नाही. देशावर टीका करण्याच्या मलाही वेदना होतात. पण देशात जर चुकीचं काही घडत असेल तर मी बोलतच राहणार. मला देशाच्या भविष्याची चिंता सतावतेय. माझ्या चार पिढ्या या देशात जन्मल्या आहेत. माझा जन्मही इथेच झालाय. माझी मुलंही इथेच राहतील. माझं माझ्या देशावर प्रेम आहे आणि हे मला गाजावाजा करून सांगायची गरज नाही,’ असं नसिरुद्दीन शहा म्हणाले. अजमेर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये गोंधळ होऊ नये म्हणूनच शहा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुष्कर येथे करण्यात आल्याचं एका वृत्त वाहिनीच्या वृत्तात म्हटलं आहे.