मी धमकी देत नाही, थेट अॅक्शन घेतो: राऊतांचा कंगना रानौतला प्रत्युत्तर

0

मुंबई: अभिनेत्री कंगना रानौत यांनी मुंबई पोलिसांवर आरोप करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना देखील लक्ष केले होते. संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचे आरोप अभिनेत्री कंगना रानौतने केला आहे. दरम्यान राऊत यांनी कंगना रानौत यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. मी पोकळ धमकी देत नाही, अॅक्शन घेतो असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांचे आत्मबलाचे खच्चीकरण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस प्रमुखांनी मुंबई पोलिसांचे आत्मबल कमी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी असे राऊत यांनी सांगितले.

भाजपने कंगना रानौतची बाजू घेतली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कंगना रानौतला झाशीच्या राणीचा उपमा देणे हा झाशीच्या राणीचा अपमान आहे असे त्यांनी सांगितले. मुंबईत राहायचे, मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायची आणि त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे असा सवालही राऊत यांनी केला आहे. मुंबईशी संबंध नसलेल्या ऐर्या-गैर्याने मुंबईबद्दल बोलू नये असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

२६/११, मुंबई बॉम्ब स्फोटमध्ये आपला जीव देणाऱ्या मुंबई पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे. मुंबई ही मुंबई पोलिसांच्या जोरावर आहे हे विसरता कामा नये असा दमही राऊत यांनी दिला आहे.