नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांनी अनेकवेळा पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान काल खडसे हे नागपुरात दाखल झाले असून त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतल्याचे बोलले जात होते. मात्र यावर स्वत: खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी नागपुरात कोणालाही भेटलेलो नाही. कोणत्याही राजकीय नेत्यांची मी भेट घेतलेली नाही असे खडसे यांनी सांगितले आहे.
पक्ष सोडण्याचा आज तरी माझा विचार नाही. ‘मी शरद पवारांना भेटू शकतो, मुख्यमंत्र्यांनाही भेटू शकतो. मात्र आज तरी मी कोणाचीही भेट घेतलेली नाही. माझ्या वैयक्तिक कामानिमित्त नागपूरला आलो असल्याचे खडसे यांनी सांगितले. खडसे हे नागपुरात असल्याने ते शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र खडसे यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिले आहे.
आजच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खडसे यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चेवर प्रतिक्रीया दिली होती. खडसे हे भाजपात अस्वस्थ आहेत, मात्र पक्ष सोडण्याबाबतचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे असे विधान राऊत यांनी केले होते.