बीड: आज स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून त्यानिमित्त गोपीनाथ गडावर त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जोरदार भाषण केले. आमच्यावर पक्षात अन्याय झाला आहे. पंकजा मुंडेवर देखील अन्याय झाला आहे. आम्ही पक्ष सोडणार अशी चर्चा आहे. मात्र पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही. मात्र मी कधीही पक्ष सोडू शकतो माझा काही भरोसा नाही असे सांगून खडसे यांनी भाजप सोडण्याचे सूचक विधान केले आहे. तसेच भाजपलाही इशारा दिला आहे. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. भाजपमधील खदखदीला खडसे यांनी वाट मोकळी करून दिली. आम्हाला हात धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे भाजपात आमचा जीव गुदमरतो आहे असे खडसे यांनी सांगितले.
यावेळी खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीने खडसे भावूक झाले. गोपीनाथराव मुंडे असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो असेही खडसे यांनी यावेळी सांगितले. पाच वर्ष झाले तरीही गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे राहू शकले नाही याचे दु:ख आहे असेही खडसे यांनी सांगितले.