मुंबई । मुख्यमंत्री माझे मित्र, आम्ही सोबत राज्याच्या राजकारणात आलो. माझा मित्र मुख्यमंत्री झाला त्याचा अभिमान आहे. मात्र सिस्टम चुकत आहे. म्हणून मी त्या विरोधात बोलतोय. मी कटकारस्थान करत नाही. मात्र माझा मित्र चुकत असेल तर मी त्याच्या विरोधात बोलणारच. मित्राने सुधारावे आणि काम करावे असा इशाराच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी मंत्र्यांना दिला. ऑनलाईन पद्धतीचा मी विरोध सुरुवातीपासून करत असून राज्यात ऑनलाईनचे स्ट्रक्चरच नसल्याचा आरोप करत ह्या सगळ्या समस्या पंतप्रधान आणि अमित शहांकडे मांडणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे हा परंपरेचा भाग
ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे हा परंपरेचा भाग असल्याचे सांगत माझ्यावर टीका होत असतील तर मी घाबरत नाही असे नाना पटोले यावेळी म्हणाले. ओबीसीमध्ये जागा निघतात, जागा भरल्या जात नाहीत. ओबीसींचा बॅकलॉक नाही असे राज्य म्हणत आहे, ही स्थिती विरोधाभासी असल्याचे पटोले यांनी सांगितले. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी तपासून अडचणी सोडवू असे सांगितल्याचे ते म्हणाले. पक्ष आणि सरकारमध्ये फरक असल्याचे सांगत मी बोललो की आमचे वरिष्ठ म्हणणात हा माझा स्वभाव आहे त्यामुळे मी जास्त बोलणे टाळतो असा टोमणा तांनी नितीन गडकरींना मारला. प्रफुल्ल पटेल इकडे येणार यांच्या नुसत्या चर्चाच असून मी जनतेचा नेता असल्याने मला भीती नाही असे ते म्हणाले.
शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेच नाही
शेतीपंपाला वीज द्यावी, धानाला योग्य भाव द्यावा यांसारख्या अनेक मागण्या घेऊन मी लढतोय असे पटोले म्हणाले. शेतकरी हिताचे निर्णय होत नसल्याने संतप्त झालेल्या पटोले यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरले. काँग्रेस सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्यांच्या विरोधात लढलो मात्र शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही असाही आरोप त्यांनी केला. कर्जमाफीच्या निकषाला माझा विरोधच असल्याचे पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला.