धुळे । सरकारमध्ये माझी भूमिका हनुमान म्हणून आहे. सोन्याच्या या लंकेमध्ये शेतकर्याच्या शेतीरुपी सीतेचा मला शोध घ्यायचा आहे, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले. धुळ्याकडून जळगावकडे जात असतांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे काही वेळासाठी धुळ्यातील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केले. शेतकरी कर्जासंदर्भात विचार केला तर केवळ 30 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकर्यांनी कर्ज घेतलेले नाही, असे सदाभाऊ म्हणाले.
भाजपाच्या एका कार्यकर्त्यांच्या घरी थांबल्यावर केली चर्चा
कर्जमुक्ती करून शेतकर्यांना फायदा झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकर्यांना पायाभूत सुविधा मिळायला हव्यात, असे मत व्यक्त करीत विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला. शेतकर्यांबद्दल आत्मियतेचा आव आणणार्यांचे ज्यावेळी सरकार होते, त्याकाळात म्हणजे गेल्या 30 वर्षात कांदा चाळीसाठी 135 कोटी खर्च झाले. मात्र, युतीच्या काळात अवघ्या अडीच वर्षात कांदा चाळीसाठी 52 कोटी खर्च करून 10 लाख मॅट्रिक टन कांदा या चाळीत सुरक्षित राहील, असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती यापुढे व्यापारी किंवा सोसायटी वर्गातून नाही तर थेट शेतकर्यांमधून निवडला जाईल, तशी बाजार समितीच्या कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येणार आहे. बाजार समिती निवडणुकीत शेतकरी मतदान करू शकेल, ही महत्वपूर्ण सुधारणा बाजार समिती कायद्यात लवकरच होणार असल्याचं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. दरम्यान, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निवेदन दिले.