नवी दिल्ली । मी देखील एक पालक आहे मी या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या पालकांचे दुःख समजू शकतो पेपरफुटी प्रकरणामुळे माझीही झोप उडाली, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेतील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना कठोरातले कठोर शासन केले जाईल. त्यांना लवकरात लवकर शोधण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत असेही प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. सीबीएसईचा पेपर लीक झाल्याने 10 वीचा गणिताचा पेपर आणि 12 वीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा घेतला जाणार आहे.
पेपर लीकच्या प्रकरणातनंतर एक विशेष तपास पथक स्थापण्यात आले आहे. या पथकाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. पोलिसांना पेपर लीक प्रकरणात कोचिंग क्लासेसवर संशय आहे. गुरुवारी दुपारीही द्वारका, रोहिणी, राजेंद्र नगर या भागातील कोचिंग क्लासेसवर छापे मारण्यात आले असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. या सगळ्या प्रकरणी दिल्लीत विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरु केली आहेत. परीक्षा घ्यायची असेल तर सगळ्याच विषयांची परीक्षा पुन्हा घ्या. फक्त एक किंवा दोन विषयांची नाही अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.