-त्या चॅनलविरोधात हक्कभंग प्रस्ताव!
-कथित ऑडिओ क्लिपवरून विधिमंडळात गोंधळ
-विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनाची भाजपची मागणी
– गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीप एका मराठी वृत्तवाहिनीने दाखविल्याने दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत भाजपकडून मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृह तीन वेळा तहकूब झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले तर विधानपरिषदेतही या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झाल्यानंतर सदस्यांनी आणि खुद्द विरोधी पक्षनेत्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर मुंडे यांच्यावरील कथित आरोप आणि विधिमंडळांसंदर्भात कथित अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्या चॅनेलच्या विरोधात विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असून अधिवेशन संपण्याच्या आत याबाबत निर्णय घेण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले.
विधानसभा गोंधळानंतर दुपारीच बंद
सभागृहाची विशेष बैठक पार पडल्यानंतर नेहमीचे कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत धनंजय मुंडे हाय हायचे फलक दाखवत मुंडे यांचे निलंबन करा, अशा घोषणा सुरू केल्या. हा गोंधळ सुरू होताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच पुन्हा भाजप सदस्यांनी वेलमध्ये धाव घालून घोषणाबाजी सुरू केली. यावेळी अनिल गोटे यांनी बोलण्यास उभे राहत धनंजय मुंडे यांच्याविषयीची ऑडिओ क्लीप टीव्हीवर प्रसिद्ध झाल्याने ही देशाला हादरवणारी घटना आहे. विधान परिषदेत लक्षवेधी विचारण्यासाठी पैसे घेतले जातात असा गंभीर आरोप या क्लीपमध्ये करण्यात आला आहे. पुराव्यासह आलेली ही टेपमध्ये विधीमंडळाचा सदस्य दलाली करतो असा आरोप आहे. याआधी मुंडे यांनी अभिभाषणाचा अनुवाद गुजरातीतून झाला असे खोटे पसरवले. त्यामुळे मुंडे यांच्या टेपची हायकोर्टाच्या सिटिंग जजकडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. ज्याप्रमाणे परिचारक यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे तत्काळ निलंबन करून चौकशी करण्यात आली त्याप्रमाणे मुंडे यांचं निलंबन करून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. भाजपकडून होणारी मुंडे यांच्या निलंबनाची तर शिवसेनेकडून परिचारकांच्या निलंबनाची मागणी यावर झालेल्या गदारोळात सभागृह तीन वेळा तहकूब झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
ऑडिओ क्लीपची न्यायालयीन चौकशी करा – अजित पवार
मुंडे यांच्यावर आरोप होत असताना अजित पवार यांनी उभे राहत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दूरचित्रवाहिनीवर जी बातमी चालली आहे त्या क्लीपमध्ये मुंडेंचे नाव नाही, आमदारांचे नाव नाही, कळसे यांचाही आवाज नाही. कुणाचाही आवाज या क्लीपमध्ये नसताना केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी बाजू मांडली. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, संसदीय कार्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी ही क्लीप ऐकावी किंवा याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
त्या चॅनल विरोधात विशेषाधिकार हक्कभंग प्रस्तावाची सूचना
– विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित आरोप आणि विधिमंडळांसंदर्भात कथित अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी न्यूज १८ लोकमत या चॅनेलच्या विरोधात विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असून अधिवेशन संपण्याच्या आत याबाबत निर्णय घेण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले. यावेळी सभापतींनी गेल्या २५ वर्षाच्या इतिहासात असा दुःखद प्रसंग घडला नाही. या विधानभवनाला एक इतिहास आहे. महाराष्ट्राचे विधानभवनात कामकाज देशातील नंबर १ चे कामकाज चालते. मुंडेंवर झालेले कथित आरोप हा एक भाग किंवा विधिमंडळावर आरोप होणे हा दुर्दैवी असल्याचे सभापती म्हणाले. लोकशाहीच्या सिस्टमवरचा विश्वास उडेल का काय अशी भीती वाटत असल्याचे ते म्हणाले. यावेळी सदस्य हेमंत टाकले यांनी प्रस्तावाचे वाचन केले. सभापतींनी सदर प्रस्ताव मान्य करून विशेषाधिकार समितीकडे सुपूर्त केल्या असून अधिवेशन संपण्याच्या आत यावर निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत.
माझ्यावर तोडपाणी करत असल्याचा आरोप होता !- खडसे
आमदार अनिल गोटे यांनी मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे. मुंडे यांचे कृत्य हे देशद्रोह्याचे कृत्य असल्याचा आरोप करत आम्ही विरोधी पक्षात असताना त्यावेळचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावरही शरद पवार यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. मात्र त्यात काहीही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी अशा मागणी केली. त्यावर एकनाथ खडसे हे मध्येच उठून उभे रहात म्हणाले की, पटलावर चुकीची माहिती जावू नये म्हणून माझ्यावर पैसे घेतल्याचा नाही तर तोडपाणी करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मात्र त्यात काहीही तथ्य आढळले नसल्याचे खडसे म्हणाले. .