मुंडेविरोधाची धार अखेर बोथट!

0

पुणे : शालेय बसची भाडेवाढ, कर्मचारीवर्गास लावलेली शिस्त, आर्थिक शिस्तीसाठी घेतलेले कठोर निर्णय यामुळे पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आवाज उठविला असतानाच, मुंबईतील पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व व स्थानिक पातळीवरील खासदारांच्या दबावामुळे या नेत्यांना मुंडेविरोधाची आपली तलवार मान्य करावी लागली आहे. या दोन्ही महापालिका शहरांत मुंडेविरोधक व मुंडेसमर्थक असे दोन गट पडले असून, त्यामुळे विरोध करणार्‍या पदाधिकार्‍यांची गोची होत आहे. मुंडे प्रकरण ताणून धरू नका, त्यातून पक्षाची बदनामी होते, अशी तंबीच मुंबईतून देण्यात आल्याचे भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले. तसेच, मुंढेंना हटविण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक गट ठराव आणण्याच्या तयारीत होता. हा ठरावही आता बारगळल्यात जमा आहे.

दोन्ही महापालिकांचे पदाधिकारी मुंढेंच्याविरोधात!
भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकारातून तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी वर्णी लावली होती. तथापि, मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर भाजप नगरसेवक नाराज झालेत व त्यांच्यामध्ये खटके उडाले. पिंपरी-चिंचवड व पुण्यात नगरसेवक, पदाधिकारी व मुंढे यांच्यात तणाव निर्माण झाल्याने स्थानिक भाजप नेतृत्व अडचणीत सापडले होते. तसेच, टेंडर न मागविता डिझेल खरेदीच्या मुद्द्यावरूनही नगरसेवक व पदाधिकारी यांनी मुंढेंवर टीकास्त्र डागले होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंढेंना हटविण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले होते. तर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मुंढे हे लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनीही मुंढेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तसेच, डिझेल खरेदीच्या मुद्द्यावर आक्षेप घेतले होते. भाजपचे स्थानिक नेतृत्व मुंढेंवर नाराज असताना, खा. शिरोळे व मुख्यमंत्र्यांनी मात्र मुंढेंची जोरदार पाठराखण केली. त्यामुळे मुंडेविरोधी गरम झालेली हवा आता निवळली आहे. तसेच, मुंढेंच्या अनेक वादग्रस्त निर्णयाकडे वरिष्ठांच्या आदेशामुळे स्थानिक नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे.

अन् मुंढेविरोधाचा ठराव बारगळला!
मुंढेंना विरोध केला तर भाजपची पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिमा खराब होईल. हे प्रकरण आपण शांततेने हाताळू. सद्या वाद निर्माण करू नका, अशा शब्दांत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने संबंधितांना समज दिली असल्याची माहिती भाजपसूत्राने दिली आहे. पदाधिकारी व पक्षाच्या नगरसेवकांच्या भावना समजता येणार्‍या आहेत. त्याची योग्यपातळीवर दखल घेतली जाईल, असेही स्थानिक नेत्यांना समजून सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिकेत ज्या प्रमाणे तुकाराम मुंढेंविरोधात ठराव पारित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतही मुंढेविरोधात ठराव घेण्याच्या हालचाली भाजपमधील एका गटाने चालविल्या होत्या. त्यासाठी विरोधी पक्षही या गटाला साथ देण्याच्या तयारीत होता. परंतु, वरिष्ठ नेतृत्वाने तंबी दिल्यानंतर या ठरावाच्या हालचाली आता थांबलेल्या आहेत.