हडपसर । पालिकेच्या मुंढवा-मगरपट्टासिटी प्रभाग क्रमांक ‘22 क’च्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पूजा कोद्रे, भाजपकडून सुकन्या गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेनेही उमेदवार दिल्याने या प्रभागात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पूजा कोद्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, निलेश मगर, नगरसेविका हेमलता मगर, संदीप कोद्रे, स्मिता लडकत, काँग्रेसचे प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते.
मनसे ही निवडणूक लढविणार नसल्याचे पालिका गटनेते वसंत मोरे यांनी आधीच जाहीर केले आहे, तर काँग्रेसने राष्ट्रवादी सोबत आघाडी करून पाठिंबा दिला आहे. शिवसेनेकडून उपशहर प्रमुख समीर तुपे यांच्या पत्नी मोनिका तुपे यांना एबी फॉर्म दिल्याने त्यांनी अर्ज दाखल केला आहे. सुरवातीला निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळून प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंढवा-मगरपट्टासिटी प्रभाग ‘22 क’ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपकडून सुकन्या गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोद्रे कुटुंबातील सदस्य पूजा समीर कोद्रे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवार आहेत. काँग्रेसने पाठिंबा दिल्याची माहिती शहर सचिव प्रशांत सुरसे यांनी यावेळी दिली.
एका जागेसाठी ऑनलाईन 24 उमेदवारी अर्ज
रिक्त जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी सोमवारपर्यंत (दि.19) प्रभागातील विविध पक्षांच्या 17 उमेदवारांनी 24 अर्ज ऑनलाइन भरले होते. मात्र, संबंधित इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले नाहीत. त्यामुळे मंगळवारीच हे चित्र स्पष्ट होईल.
विजया कापरे पुन्हा राष्ट्रवादीत दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक 23मधून राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने गत निवडणूक शिवसेनेकडून लढलेल्या विजया कापरे या प्रभाग क्रमांक ‘22 क’ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्यावर त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथील उमेदवारी होती; पण कोद्रे कुटुंबात उमेदवारी राष्ट्रवादीने दिली आहे.