मुंढे यांची बदली मुदतपूर्व झाल्याने भाजपची प्रतिमा धूसर

0

पुणे । कडक शिस्त ठेवून पीएमपीचा कारभार मार्गी लावणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. मुंढे यांची बदली मुदतपूर्व झाल्याने भाजपची प्रतिमा धूसर झाली आहे. काही कारणावरून महापौर आणि मुंढे यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी मुंढे हे चांगले अधिकारी आहेत त्यांना समजून घ्या, असा सल्ला भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी दिला होता. परंतु मुदतीपूर्वी मुंढे यांची बदली झाल्याने शिरोळे समर्थकांना आश्‍चर्य वाटले. खुद्द शिरोळे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, नवीन अधिकारी चागले काम करतील अशी अपेक्षा ठेवू.

मुंढे यांचा पीएमपीत दरारा
पीएमपीतील कामचुकार अधिकार्‍यांना निलंबीत करणे, बडतर्फ करणे अशी ठाम पावले मुंढे यांनी उचलली होती. कामावर दांड्या मारणार्‍या कर्मचार्‍यांनाही कारवाईला सामोरे जावे लागले. त्यातून कामचुकार स्टाफमध्ये मुंढे यांचा दरारा निर्माण झाला होता. पीएमपीच्या खासगी ठेकेदारीला वेसण घातले होते. पीएमपीच्या यंत्रशाळा सुधारल्याने बसेस ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण घटत चालले होते. मुख्य म्हणजे पीएमपी प्रवाशांची संख्या वाढू लागली होती. गेल्या दहा वर्षात प्रवासी वाढविण्याचे काम अधिकार्‍यांना जमले नव्हते ते मुंढे यांनी करून दाखविले.

भाजपनेही अवलंबले काँग्रेसचे धोरण
खासदार शिरोळे वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मुंढे नको होते. त्यांच्या कारवाई, पारदर्शक व्यवहार, सडेतोड भूमिका याबाबी लोकप्रतिनिधींना खटकणार्‍या होत्या. आगामी काळात मोठ्या प्रमाणात बसगाड्यांची खरेदी केली जाणार आहे. या व्यवहारातील हितसंबंधात मुंढे एका गटाला नको होते. त्यांनी दबाव आणून बदली करवून घेतली, असे बोलले जाते. मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे हाती घेतली तेव्हाच ते किती काळ या पदावर टिकणार, अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. काँग्रेस राजवट असताना मुंडे यांच्या बदल्या वारंवार झाल्या आणि भाजपनेही याबाबत काँग्रेसचे धोरण चालू ठेवले. मुंढे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही पण त्यांच्यात हटवादीपणा होता. त्यामुळे त्यांच्या बदल्या होत गेल्या, असाच हटवादीपणा ठेवल्यास यापुढेही त्यांच्या बदल्या होत राहतील, अशी परखड प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जनशक्तिशी बोलताना व्यक्त केली.