पोलादपूर : तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन प्रक्रिया नऊ गावांमध्ये होणार असून यापैकी पार्ले गावातील लाभार्थी बाधितांना मोबदले देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाधितांकडून मोठया उत्साहाने मोबदल्याच्या रकमा स्विकारण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करण्याची लगबग सुरू आहे. तालुक्यातील एकूणच जमिनींचा दर कमी लावून किंमतीच्या पाचपटीने मोबदला देण्याची भाषा सरकारातील मंत्र्यांकडून चर्चेत घेतली गेली असताना मूळ बाजारभावापेक्षाही खूपच कमी किंमत निश्चित होत असल्याने लक्षात येताच काही बाधितांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना यासंदर्भात निवेदन देऊन सदर मोबदल्याची रक्कम अंडरप्रोटेस्ट स्विकारीत असल्याचे धोरण जाहिर केले आहे.
पोलादपूर तालुक्यातील लोहारे शिवमंदिरामध्ये पार्ले गावापासून भूसंपादनाचे मोबदले देण्यास सुरूवात झाल्यानंतर निर्धारित कार्यक्रमानुसार पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील 25650 क्षेत्रावरील 253 बाधित लाभार्थ्यांना गुरूवार, दि.27 जुलैरोजी मोबदला वाटप स्विकारण्यासाठी पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये बाधितांची मोठया संख्येने गर्दी जमली.
यावेळी बाधितांपैकी दिलीप भागवत, राजन धुमाळ, उदय खरे, विजय धुमाळ, सचिन शेठ, सुप्रिया शेठ, सुनील जगताप, नागेश पवार, अशोक बुटाला, सूर्यकांत गरूड तसेच काही ग्रामस्थांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन देऊन भूसंपादनाचा मोबदला सध्या 1.03 लक्ष प्रतिगुंठा आहे तो 20 लक्ष प्रतिगुंठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह चौपदरीकरणामध्ये होणारा रस्ता अंडरपास बॉक्स सिस्टीम म्हणूने उघडया पध्दतीचा भुयारस्वरूप दूतर्फा भिंती बांधून असल्याने तो अन्यायकारक असल्याचे नमूद केले आहे. रेडीरेकनरचा दर हा ग्रामपंचायत गृहित धरून असल्याकडे लक्ष वेधून तो नगरपंचायतीला अनुलक्षून करण्याचे आवाहनही या निवेदनामध्ये करण्यात आले आहे.
पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये भूसंपादनाचा प्रतिगुंठा दर केवळ 1.03 असून लोहारे ग्रामपंचायत नजिकच्या हद्दीतील जमिनीपेक्षाही कमी असल्याने मोजक्याच बाधितांनी अंडरप्रोटेस्ट घेतलेल्या मोबदल्याची रक्कम स्विकारून यापुढील हक्क अबाधित असल्याचे नमूद केले आहे.