मुंबई । वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. अजून पुढचे काही दिवस मुंबईकरांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मात्र, अंगाची लाही लाही करणार्या या उन्हात त्यांची तहान भागवण्यासाठी काही मुंबईकर पुढे सरसावले आहेत. ते दादर स्थानकाच्या पुलावर मोफत थंडगार पाणी वाटप करताना दिसत आहेत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून दादर येथील श्री धर्मेश्वर महादेव मंदिराचे कार्यकर्ते दादर स्थानक येथे गुढीपाडव्यापासून 31 मे पर्यंत रोज सकाळी 11 ते 2 या वेळात थंडगार पाण्याचे वाटप करतात.
दररोज सुमारे 1600 लिटर पाणी
यावेळी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहेत. तसेच ही सेवा ते विनामूल्य करत आहेत. या उपक्रमाचे कौतुक मुंबईकर तर करत आहेतच, पण पालिकेकडून देखील त्यांना पाणी वाटपाचे टेबल लावण्यास परवानगी मिळते. रोज सुमारे 1600 लिटर पाणी आणि त्या पाण्यात 100 ते 150 किलो बर्फ टाकून थंडगार पाण्याचे वाटप ही संस्था करते, अशी माहिती संप्रदाय प्रमुख शिरीष वेरकर यांनी दिली.