मुंबईकरांचे हाल करून 16 तासांनी बेस्ट बातमी

0

मुंबई | रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधून रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारून 16 तास सामान्य मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर अखेर प्रशासनाच्या कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय सोमवारी दुपारी बेस्टच्या 36 हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला. या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाल्याबद्दल मध्यस्थ, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘बेस्ट’चा कारभार सुधारा नाहीतर एक दिवस बेस्ट नक्कीच बंद पडेल, अशा कानपिचक्याही यावेळी त्यांनी कर्मचारी संघटना प्रतिनिधींना दिल्या.

कशासाठी केला होता संप?
बेस्ट कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वेतन मिळेल, अशी लेखी हमी हवी होती. मात्र मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी लेखी आश्वासनास नकार दिला होता. त्यानंतर संप सुरु झाला. सोमवारी दुपारी ‘मातोश्री’वरील बैठकीत उद्धव यांनी ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील, असे आश्वासन दिल्यानंतर शशांक राव यांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली, असे समजते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाल्याचा हवाला उद्धव यांनी दिला होता. संप मागे घेतल्यानंतर ‘बेस्ट’चे कर्मचारी हळूहळू कामावर रुजू झाले व सायंकाळपर्यंत सेवा पूर्वपदावर आली.

‘मातोश्री’च्या बैठकीत तोडगा
या संपाबाबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. बेस्ट कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, सुहास सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर संप मागे घेण्यात आला. ‘तुमची जबाबदारी आम्ही घेतो’, असे आश्वासन उद्धव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, असे आवाहन शशांक राव यांनी केले. ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत अध्यादेश काढला जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात सुधारित विधेयक आणले जाणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली.