मुंबईकरांच्या हालाला शिवसेना-भाजपा जबाबदार

0

मुंबई | मुंबईत मंगळवारी पडलेल्या पावसामुळे झालेल्या मुंबईकरांच्या हालाला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार तसेच मुंबईचे महापालिका आयुक्त जबाबदार असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. या पक्षांनी महापालिकेची सत्ता सोडावी तसेच पालिका आयुक्त अजोय महेता यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दिवसभराच्या पावसामुळे पूर्ण मुंबई ठप्प झाली आहे. रेल्वे सेवा बंद पडली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. हिंदमाता परिसरात चार ते पाच फूट पाणी साचले आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी भरले आहे. अंधेरी सबवे आणि वरळी सी लिंक मार्ग बंद करण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजपा सरकार व महापालिका आयुक्त अजोय महेता जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने सहा पंपिंग स्टेशन्स बसवले आहेत. ज्यासाठी १२०० कोटी रूपये खर्च झाले आहेत ते नादुरूस्त आहेत. महापालिकेद्वारे दरवर्षी सुमारे दोन हजार कोटी रूपये मलनिःसारण योजनेवर खर्च केले जातात. ४०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले जातात. तरीही मुंबई तुंबलेलीच आहे. मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असा दावाही निरूपम यांनी केला.