मुंबई: मुंबईकरांचे एसी लोकल प्रवासाचे स्वप्त आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण या एसी लोकलची आज ठाणे ते टिटवाळा या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे घामाच्या धारांनी हैराण होणार्या मुंबईकरांना आता गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.
वर्षभरापूर्वी एसी लोकल मुंबईत दाखल झाली होती. तीची यापूर्वीही चाचणी घेण्यात आली होती. सुमारे 55 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल वर्षभरापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली. प्रारंभी पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला. परंतु आता पुन्हा या निर्णयात बदल करुन ती पश्चिम रेल्वेवरच धावेल, असे सांगण्यात येत आहे.
वर्षभरापूर्वी रेल्वेने मुंबईकरांना एसी लोकलचे स्वप्न दाखवले होते. ती लोकल मुंबईत आणून मोठा गाजावाजाही केला. पण अजूनही ती लोकल यार्डातच पडून होती. चाचणीच्या नावाखाली ती लोकल वर्षभर यार्डातच बंद ठेवावी लागली. जर एसी लोकल ट्रेन रुळावर आणण्यासाठी तिची चाचणी करण्याकरता 1 वर्ष लागणार असेल, तर ती प्रत्यक्ष रुळावर उतरवल्यास तिची किती सुरक्षित असणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.