मुंबईकरांना थंडीचा कडाका आठवडाभर कायम राहणार!

0

मुंबई । गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भात गारपिटीसह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने राज्यातील हवामानात कमालीचा बदल झाला आहे. हा बदल मुंबईतही जाणवू लागला असून, मुंबईकरांना दुपारी गार वार्‍यांसह रात्री थंडीचा अनुभव मिळत आहे. मुंबईकरांना सकाळी थंडी, दुपारी काही प्रमाणात ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी हवेतील गारव्याचा अनुभव येत आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आणखी आठवडाभर मुंबईकरांना असाच अनुभवता येणार आहे.

किमान तापमान दीडपट खाली येण्याची शक्यता
एवढेच नव्हे, तर सध्या कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दीडपट खाली येण्याची शक्यता असल्याचे मुंबई हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे. ‘आयएमडी’च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर म्हणजेच 18 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान सरासरी 19 अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकते. त्यामुळे पुढचा आठवडाभर मुंबईकरांना आल्हाददायक गारवा अनुभवता येईल.