मुंबईकरांना मनोविकाराने पछाडले

0

मुंबई । मुंबईतील महापालिका रुग्णालयात विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण उपचारांकरिता येत असले तरी यामध्ये मनोविकार आजाराचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या मागील दोन वर्षांतील रुग्णांच्या आकडेवारीचा सर्व्हे केला असता ही बाब समोर आली आहे. तब्बल 31 टक्के रुग्ण हे मनोविकाराचे आढळून आले आहेत. त्याखालोखाल रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेची 4 प्रमुख रुग्णालये, 15 उपनगरीय रुग्णालये आणि 175 दवाखान्यांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान आलेल्या रुग्णांपैकी 72 लाख 61 हजार 130 रुग्णांशी संबंधित माहितीचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 7 दिवस रुग्णालयात वा दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन, त्या 7 दिवसांत आलेले बाह्यरुग्ण किंवा आंतररुग्ण म्हणून दाखल झालेल्या 1 लाख 13 हजार 472 रुग्णांच्या माहितीचादेखील अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार तब्बल 73 लाख 74 हजार 602 रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनास सादर करण्यात आला आहे.

हा अभ्यास अहवाल महापालिका प्रशासनास सादर करण्याच्या निमित्त्ताने एका विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगर) आय. ए. कुंदन, वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, शीव रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. जयश्री मोंडकर, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे डॉ. दीपक राऊत आणि डॉ. एस. सुधाकर, महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, मनपा विशेष रुग्णालयांचे प्रमुख डॉ. शशिकांत वाडेकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय डॉ. रुस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान अभ्यास अहवालावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

मनोरुग्णांची संख्या 31.14 टक्क्यांवर
महापालिकेच्या 4 प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजेच केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान येऊन गेलेल्या रुग्णांपैकी 5 लाख 59 हजार 954 रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 31.14 टक्के रुग्ण हे मनोविकारांवरील उपचारांसाठी आल्याचे दिसून आले. अभ्यासण्यात आलेल्या 5 लाख 59 हजार 954 रुग्णांच्या माहितीपैकी 1 लाख 74 हजार 379 रुग्ण (31.14 टक्के) हे मनोविकारांवरील उपचारांसाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आले होते.

मधुमेह, रक्तदाबाने मुंबईकर त्रस्त
याखालोखाल मधुमेहाचे 23.22 टक्के, रक्तदाबाचे 22.78 टक्के, श्‍वान/प्राणी दंश 9.95 टक्के, हदयविकार 7.49 टक्के, डेंग्यू 1.5 टक्के, दमा 1.4 टक्के, अनाकलनीय ताप 1.38 टक्के, जुलाब 0.61 टक्के आणि 0.53 टक्के हिवतापाचे रुग्ण असल्याचे अभ्यासादरम्यान आढळून आले.

मनपाची 4 प्रमुख,15 उपनगरीय रुग्णालये आणि 175 दवाखान्यांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत 72 लाख रुग्णांशी संबंधित माहितीचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण करण्यात आले

मुंबईतील महापालिका रुग्णालयात विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण उपचारांकरिता येत असले तरी यामध्ये मनोविकार आजाराचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहे