महापालिका, राज्य सरकार दोषी आहेतच; पण प्लास्टिकच्या अतिवापराने पाण्याच्या निचर्याची वाट अडवली ती मुंबईकरांनीच…26 जुलैला मुंबईत 944 मि.मी. पाऊस झाला होता. परवा फक्त 315 मि.मी. म्हणजे 2005च्या तुलनेत तीन पट कमी पाऊस होऊनही मुंबई तुंबली. 12 वर्षांत नालेसफाई, मुंबईतील पाण्याचा निचरा यावरील 36,000 कोटी पाण्यात वाहून गेले. गेल्या 12 वर्षांत ना दळभद्री मुंबई महापालिकेने काही केले, ना नतद्रष्ट राज्य सरकारने. आता हा जबाबदार, तो जबाबदार म्हणून एकमेकांकडे बोट दाखवण्याचा खेळ सुरू झालाय. या राजकारणाच्या पलीकडे जर खरंच मुंबईच्या दुर्दशेला आणि तुंबातुंबीला जबाबदार असेल तर तो सर्वसामान्य, निष्क्रिय, निद्रिस्त मुंबईकरच! दचकलात ना? पण मुंबईकरांनो, हे तर तुमचंच पाप आहे. गटार, नाले प्लास्टिकने तुंबवले ते या शहरातील बेफिकीर लोकांनीच. नदी-नाल्यांचे प्रवाह वळवले, बुजवले तेही मुंबईकरांनीच… सिमेंटच्या जंगलात अतिक्रमणे बोकाळली, तुमच्या शहराच्या नैसर्गिक संरचनेवर बलात्कार होत राहिले तेव्हा मला काय त्याचे, माझे काय जाते या वृत्तीने झोपून राहिले ते मुंबईकरच! आता महापालिका, सरकार किंवा याच्या-त्याच्या नावे खडे फोडण्यात अर्थ नाही. तुम्हीच तुमच्या विनाशाचे खरे कारण आहात; पण अजूनही वेळ गेलेली नाही, जागे व्हा. तुमच्या शहराला अतिक्रमणमुक्त करा, नद्या-नाल्यांचे प्रवाह मोकळे करा आणि प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापराला तिलांजली द्या.
बारा वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेनंतर मिठी नदीचा शोध लागला होता. काही दिवस मिठी पुनर्विकासाचे तुणतुणे वाजले आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या! 12 वर्षांपूर्वी मुंबईची जी दुखणी होती, ती आजही जशीच्या तशी आहेत. जुन्या दुखण्यांवर उपाय दूरच राहिले, नवी अनेक दुखणी तयार झाली आहेत आणि त्यामध्ये सरकार, महापालिकेसह मुंबईकरांचाही तेवढाच वाटा आहे. मिठीबरोबरच दहिसर, ओशिवरा, पोईसर अशा मुंबईत चार नद्या आहेत ते कधीतरी तडाखा दिल्यावरच आठवते. 2005 मध्ये मिठी संतापली होती, परवा दहिसर आणि ओशिवरा नदीने रौद्ररूप धारण करून हिसका दाखवला. या नद्या म्हणजे त्यांच्या प्रवाहाचा गळा घोटून, अतिक्रमणे करून अक्षरश: नाल्यात रूपांतरित करून टाकल्याहेत. त्यातून गटारीचे घाण सांडपाणी वाहते. मिठी नदीसाठी किमान 1400 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही हाती काहीही येत नाही. सरकारी पातळीवरील अनास्था चिंताजनक आहे. दहिसर नदी तबेल्यावाल्यांनी घाण करून ठेवलीय. मेलेल्या म्हशी, बैलांनाही नदीपात्रात फेकून दिले जाते. त्यात धोबीघाटाच्या प्रदूषणाची भर पडते. पोईसर नदीत कधीकाळी लोक पोहायला यायचे, तिचे स्वच्छ पाणी प्यायचेही. आता समता नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, जोगळेकर नाला, मजिठिया नाला पोईसर नदीला जोडून दिले आहेत. ती सर्व घाण नदीत येते. 1985मध्ये या नदीच्या महापुरात मोहितेवाडी उद्ध्वस्त केली होती. रिव्हर मार्च संस्थेच्या मदतीने गेल्या वर्षीच मूळ कांदिवली निवासितांनी पोईसर नदी पुनरुज्जीवनाची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला आता बळ दिले जायला हवे.
ओशिवरा नदीची स्थिती सर्वात दयनीय आहे. इथेही कंपन्यांचे औद्योगिक, रासायनिक प्रदूषण. 100 वर्षांपूर्वी मुंबईचे वैभव व सौंदर्यस्थळ असलेली मिठी उगमस्थळाहून स्वच्छ पाणी घेऊन येते; पण पुढे मुंबईकर घाण करतात. ही नदी शहराशी संपर्कात येईपर्यंत स्वच्छ आहे. मात्र, शहरात प्रवेश करताक्षणी धोबीघाटाच्या साबणापासून, प्लास्टिक, कचरा, गायीगुरांचे गोठे, तबेले यातील शेण, मलमूत्र, डेब्रीज, मानवी विष्ठा, किनार्यावरील लघुउद्योगांमधून येणारे सांडपाणी अशी सारी घाण सामावून घेत ही नदी पुढे जाते.
शहरीकरण, औद्योगिकीकरण, अतिक्रमण आणि विकासाने नद्यांच्या प्रवाहाची वाट लावली. वांद्रे-वरळी सी-लिंकमुळे तर मिठी नदीचे 80-85% पाणी थबकून राहते. शहरात साचणारे पाणी वेगाने निचरा होऊन जाणार कुठे? त्याला वाट ठेवलीय का मुंबईकरांनी? जोडीला मेट्रो, मोनोच्या कामाच्या डेब्रीज कचर्याने नद्यांचा गळा घोटला. परवा 26 जुलैलाही जे झाले नव्हते ते दिसले. मुलुंड स्टेशनवर धबधबा वाहत होता. हे प्रथमच घडले ते अतिक्रमण आणि नाल्याशी छेडछाड केली गेल्याने.
नद्यांचे मार्ग
दहिसर नदीः उगम-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान; श्रीकृष्णनगर, दौलतनगर, कंदरपाडा, संजयनगर, पुष्पा विहार, दहिसर मार्गे मनोरीजवळ अरबी समुद्राला मिळते.
पोईसर नदीः उगम-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान; आप्पा पाडा, क्रांतीनगर, कुरार गाव, हनुमाननगर, महिंद्रा अँड महिंद्रामार्गे मालाडच्या खाडीत जाऊन मिळते.
ओशिवरा नदीः उगम – आरे; गोरेगाव के नागरी निवारा, राममंदिर, ओशिवरा, भगतसिंह नगरमार्गे मालाडच्या खाडीत जाऊन मिळते.
मिठी नदी ः उगम – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान; विहार तलाव, आरे कॉलोनी, पवई तलाव, एल अँड टी, जेवीएलआर, सीप्झ, एअरपोर्ट, बांद्रा -कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गे माहीमच्या खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते.
लक्ष्य सांडपाण्याच्या पुनर्वापराचे
मुंबईत घराघरांत वापरल्या जाणार्या पाण्यापैकी 70 टक्के पाण्याचे सांडपाण्यात रूपांतर होते. त्यातील 30 टक्के पाणी धुतलेल्या कपड्याचे, 33 टक्के पाणी शौचालयातील असते. अशा प्रकारे मुंबईत दररोज सरासरी 1970 दशलक्ष लीटर्स सांडपाणी समुद्रात सोडले जाते. या पाण्यात असंख्य प्रकारची घातक रसायने असतात. मुंबईत दररोज निर्माण होणार्या सांडपाण्यापैकी सुमारे 65 टक्के पाण्यावर पालिकेच्या प्रकल्पात प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाते. उर्वरित 35 टक्के सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न होत समुद्रात खाड्यांमध्ये व नद्यांमध्ये जाते. मुंबई महापालिकेचे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प मुंबईत कुलाब्यापासून वर्सोव्यापर्यंत आहेत. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात खोलवर नेऊन सोडले जाते. पण असे असले तरी अजूनही हे सांडपाणी पूर्णपणे शुद्ध होत नाही. कुलाबा, वांद्रे वरळी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातील कुलाबा, वरळी, वांद्रे येथे पालिकेचे मरीनआऊटफॉल म्हणजे सागरी पाचमुखे आहे. या तीन ठिकाणी प्रक्रिया केलेले सांडपाणी साडेतीन मीटर व्यासाच्या पाइपलाइनमधून किनारपट्टीपासून साडेतीन कि.मी.पर्यंत आत समुद्रात नेऊन सोडले जाते. पण कुलाबा, वरळी, वांद्रे व मालाडमध्ये सांडपाण्यावर प्राथमिक पातळीवरील प्रक्रिया केली जाते. म्हणजे सांडपाण्यातील गाळ व तरंगते पदार्थ, प्लास्टिक घातक पदार्थ सांडपाण्यातून बाहेर काढले जातात, तर वर्सोवा, भांडुप व घाटकोपरमध्ये सांडपाण्यावर दुसर्या पातळीवरील प्रक्रिया केली जाते. हे सांडपाणी पाणी मोठ्या कृत्रिम तलावात घुसळले जाते. त्यात ऑक्सिजन सोडून जीवाणूंचे विघटन होते. त्यामुळे सांडपाण्यातील घातक पदार्थांचा गाळ खाली बसतो.
अजूनही वेळ गेलेली नाही, जागे व्हा..! विनाश वाचवा!
महापुराला महापालिका, राज्य सरकार दोषीच; पण प्लास्टिकच्या अतिवापराने पाण्याच्या निचर्याची वाट अडवली कुणी? नदी-नाल्यांचे प्रवाह वळवले, बुजवले, सिमेंटच्या जंगलात अतिक्रमणे बोकाळली तेव्हा झोपला होतात काय? 29 ऑगस्टला पावसाने मुंबईची दैना उडवली. 26 जुलै 2005 मध्ये जे झाले होते तेच पुन्हा 12 वर्षांनंतर तसेच घडले. 12 वर्षांत नालेसफाई, मुंबईतील पाण्याचा निचरा यावरील 36,000 कोटीही पाण्यात वाहून गेले.
– अमोल देशपांडे
वृत्त समन्वयक, जनशक्ति, मुंबई
9987967102