मुंबईचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला कोस्टल रोड आकारास येणार

0

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दरबारच्या प्रयत्नाला यश आल्याने महापालिकेचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला कफपरेड ते दहीसर हा प्रस्तावित कोस्टल रोड आता आकारास येणार आहे. त्यासाठी अडथळ्याची शर्यत ठरलेल्या पर्यावरण आणि केंद्राच्या परवानग्या आता मिळाल्या आहेत. तो रोड नेमका कसा असणार आहे, याची एक चित्रफीत मुंबई महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आली आहे. 29.20 किमी लांबीचा हा कोस्टल रोड असून, तो मरिन लाइन्सवरील प्रिन्सेस स्ट्रीटपासून कांदिवलीपर्यंत असणार आहे.

11 ठिकाणी इंटरचेंजेस आणि दोन बोगदेही बांधणार
या प्रोजेक्टचे बजेट तब्बल 15 हजार कोटी रुपयांचे आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते बांद्रा वरळी सी लिंक या पहिल्या टप्प्यासाठी 5 हजार 300 कोटी रुपये तर बांद्रा वरळी सी लिंक ते कांदिवली या दुसर्‍या टप्प्यासाठी 9 हजार 790 कोटी रुपये खर्च येणार आहेत. दरम्यान, 29.20 किमी अंतरामध्ये दोन बोगदेही बांधले जाणार असून त्यांची लांबी 6 किलोमीटर असणार आहे. कोस्टल रोड शहरातील अंतर्गत रस्त्यांशी जोडण्यासाठी 11 ठिकाणी इंटरचेंजेस ठेवले जाणार आहेत तसेच हा कोस्टल रोड बनवण्यासाठी 168 हेक्टरवर भराव टाकला जाणार असून, यापैकी 98 हेक्टर क्षेत्र हे हरित क्षेत्राखालील आहे. कोस्टल रोडवर दोन्ही बाजूला सार्वजनिक वाहतूक म्हणजे बेस्ट बसेससाठी वेगळी मार्गिका ठेवली जाणार आहे. ऑक्टोबर 2017 पासून खर्‍या अर्थाने कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात होणार आहे.

अहमदाबादपर्यंत कोस्टल रोड बांधण्याचे स्वप्न
मुंबईतील कोस्टल रोड अहमदाबादपर्यंत जावा असे सरकारचे स्वप्न आहे. तीन टप्प्यांत होणार्‍या या रोडचे काम या पावसाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या कामासाठी तयारी दर्शवली असल्याबाबत मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी जास्त प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांगले सहकार्य केल्याचे बोलले जाते.

कोस्टल रोड प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली हे 29.20 किलोमीटरचे अंतर 35 मिनिटात पार होणार
बांधकाम पूर्ण होण्यास किमान 4 ते 5 वर्षे लागणार
प्रत्येक दीड ते दोन किलोमीटरवर एक एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट
प्रकल्पाचे एकूण बजेट अंदाजे 15 हजार कोटींचे असेल
पर्यावरणाच्या सर्व परवानग्या मिळाल्याने मार्ग मोकळा
दोन बोगदेही बांधले जाणार असून, त्यांची लांबी 6 किलोमीटर असणार