मुंबईची झाली तुंबई!

0

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी पावसाने मुंबई आणि ठाण्यात नागरिकांची दैना उडविली. तुफान कोसळणार्‍या या पावसामुळे मुंबईकरांना 26 जुलैचीच आठवण झाली. मात्र, हे वादळ किंवा ढगफुटी नाही असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिले. पुढील 24 तास मुंबईत जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई दिवसभर ठप्प पडली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफची तीन पथके मुंबईत सज्ज ठेवण्यात आली होती तर दोन पथके पुण्याहून मागविण्यात आली होती. सोमवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले होते. मुंबईच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्चिम, पूर्व आणि हरभर रेल्वे मार्गावरील लोकल सेवादेखील ठिकठिकाणी पाणी शिरल्याने ठप्प झाली होती. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला होता. गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा आढावा घेत, सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, पुणेसह पिंपरी-चिंचवड शहरातही पावसाने दिवसभर हजेरी लावली. राज्यभरातही मुसळधार पाऊस सुरु होता. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली होती.

26 जुलै 2005 नंतरचा सर्वाधिक पाऊस
26 जुलै 2005च्या जलप्रलयाची आठवण मुंबईकरांना मंगळवारच्या पावसाने करून दिली. त्या पावसाच्या तुलनेत मंगळवारचा पाऊस कमी होता, पण त्या ढगफुटीनंतर एका दिवसात इतका पाऊस गेल्या 12 वर्षानंतर आजच झाल्याचे जाणकारांनी सांगितले. मंगळवारी सकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केले होते. सोबतीला वादळी वाराही असल्याने मुंबईकर धास्तावले होते. सांताक्रूझमध्ये 3 तासांत 87 मिमी, दादरमध्ये 155 मिमी तर महालक्ष्मी परिसरात 105 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत 24 तासांत सरासरी 15 सेंटीमीटर पाऊस पडला. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होत. रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्याने लाइफलाइन विस्कळीत झाली होती.

नागरिकांना खबरदारीचा इशारा
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. अर्थात, हे ढगफुटीची किंवा वादळाचा धोका नाही. तरीही नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाने केले. सरकारी-खासगी कार्यालयांतील कर्मचार्‍यांनी पाऊस कमी होईपर्यंत बाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.

गरज असेल तरच घराबाहेर पडा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागात जाऊन मुंबईतील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याचे काम सुरू आहे. पावसात अडकलेल्या मुंबईकरांनी पोलिस किंवा महापालिकेच्या आपत्कालिन विभागाशी संपर्क साधावा. तुम्ही कुठेही अडकला असाल आणि मदतीची गरज असेल तर ट्विट किंवा फोन करून पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस तात्काळ तिथे पोहोचतील आणि तुम्हाला मदत करतील. तसेच वाहतूक पोलिसांकडून दिल्या जाणार्‍या निर्देशाचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अशी उडाली दाणादाण
सलग तिसर्‍या दिवशी मुंबई-ठाण्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दक्षिण मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर प्रचंड होता. वादळीवार्‍यामुळे मुंबईकर आणखी बेजार झाले होते. बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहिम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. पावसामुळे भायखळा, लालबाग, परळ, माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला होता. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी आणि घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथे वाहतूक कोंडी झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्या परिसरातील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती.

अ‍ॅलर्ट : पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस
येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि नॉर्थ ईस्टच्या काही भागातही मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

केंद्राकडून सर्वोतोपरी मदत : पंतप्रधान
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून शहरवासीयांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. मुंबईतील निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असून यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल. मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि सुरक्षित जागी थांबावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

मुंबईत-पुणे, नाशिक महामार्ग बंद
मुंबईतील तुफान पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही परिणाम झाला असून, या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने थांबवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेचा द्रूतगती मार्ग सायंकाळी साडेसहापासून बंद केला. एक्स्प्रेस वेवरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करण्यात आली होती. तर नशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबविण्यात आली होती. नवी मुंबई वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बाहेरील वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. पुणे आणि गोवा मार्गाने नवी मुंबईत येणार्‍या वाहनांना शहराबाहेर थांबवण्यात येत होते.