मुंबई :- आयपीएलच्या ११ व्या सत्राच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या वर्षी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र संघाची कामगिरी पाहता सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स या हंगामात आपली पकड बनवू शकला नाही. मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने वानखेडे मैदानावर गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव केला. हैदराबादने दिलेलं अवघ्या ११९ धावांचं माफक लक्ष्यही मुंबईच्या संघाला गाठता आलं नाही. या सत्रामधील मुंबई इंडियन्सचा पाचवा पराभव आहे, तर सनरायझर्स हैदराबाद लीगमधील चौथा विजय ठरला.
कर्णधार विलियम्सन (२९) आणि युसूफ पठाणच्या (२९) एकाकी झुंजीमुळे प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला ११८ धावसंख्या काढता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करीत मुंबई इंडियन्स संघाचा १८.५ षटकांत अवघ्या ८७ धावांवर खुर्दा उडाला. मुंबईच्या विजयासाठी सलामीवीर युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने दिलेली झुंज अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा हि माघारी परतल्याने संघाला विजयाचा पाठलाग करताना दमछाक करावा लागला. घरच्याच मैदानावर मुंबईच्या संघाला ३१ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्याने खुद्द कर्णधार रोहित शर्मानेही अखेर निराशा व्यक्त केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निदान आजतरी संघाची अफलातून कामगिरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. अखेर मुंबईच्या प्रभावाने निराशा पदरी पडली.