मुंबईचे डबेवाले बुधवारी घेणार सुट्टी

0

मुंबई । पावसाळा असो किंवा मुंबईची तुंबई होवो, वर्षभर मुंबईकरांना डबेवाले वेळेत डबा पोहोचवितात. पण मुंबईचे डबेवाले येत्या बुधवारी 1 दिवसीय सुट्टी घेणार आहेत. त्यामुळे कार्तिकी द्वादशीनिमित्त डबेवाल्यांची मुंबईत डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या दोन एकादशी डबेवाल्यांसाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे आषाढी एकादशीला ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि कार्तिकी एकादशीला ते आळंदीला ज्ञानेश्‍वर महाराजांच्या दर्शनाला जातात.

धार्मिक कार्यासाठी सुट्टी
मुंबईपासून आळंदीचे अंतर जवळ आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी डबेवाले दिवसभर मुंबईत काम करणार आहेत. त्यानंतर ते सायंकाळी आळंदीला ज्ञानेश्‍वर महाराजांच्या दर्शनाला जाणार आहेत. आळंदीला डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत जेवढे वारकरी मुक्कामास येतात, त्या सर्वांची विनामूल्य राहाण्याची व द्वादशीच्या भोजनाची सोय डबेवाल्यांच्या वतीने दरवर्षी केली जाते. तशी सोय मुंबईचे डबेवाले यंदादेखील करणार आहेत. त्यामुळे येत्या बुधवारी मुंबईत डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.