नाशिक विभागात भुसावळ तालुक्यात ई पॉस मशिनद्वारे सर्वाधिक कमी धान्य वितरण
भुसावळ- शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ई पॉस मशिन दिल्यानंतरही त्यांच्याकडून पारंपरीक पद्धत्तीने स्वस्त धान्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार वराडसीमचे कैलास पारधी यांनी वरीष्ठ स्तरावर केल्यानंतर मुंबईतील दहा अधिकार्यांचे राज्यस्तरीय दक्षता अधिकार्यांचे पथक भुसावळात शुक्रवारी धडकले. या पथकाच्या अधिकार्यांनी दोन टीमद्वारे शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची बारकाईने तपासणी केली जात असल्याने रेशन दुकानदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक विभागात ई पॉस मशिनद्वारे धान्य वितरणात भुसावळ तालुका सर्वाधिक मागे असल्याने त्याचीही दखल घेण्यात आली आहे.
दहा अधिकार्यांच्या पथकाकडून तपासणी
मुंबईहून आलेल्या राज्यस्तरीय दक्षता पथकाकडून भुसावळ शहर व तालुक्यात असलेल्या सुमारे 129 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली जात आहे. ई पॉस मशिनद्वारे आतापर्यंत किती लाभार्थींना धान्याचे वितरण झाले तसेच स्टॉक रजिस्टर तसेच अन्य कागदपत्रांची बारकाईने पाहणी केली जात आहे. स्वस्त धान्य दुकानाला जोडलेल्या लाभार्थींची संख्या व त्याप्रमाणात स्वस्त धान्याचे किती प्रमाणात वाटप झाले याचा ताळमेळही जुळवून पाहिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पथकाला आढळलेल्या चुका तसेच दुकानदारांबद्दलचा अभिप्राय हे पथक वरीष्ठ स्तरावर सादर करणार अल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.
भुसावळातील धान्य घोटाळा चर्चेत
गतवर्षी 19 जानेवारी 2018 रोजी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी भुसावळातील धान्य गोदामात क्विंटलमागे 10 ते 12 किलो धान्य कमी दिले जात असल्याची तक्रार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी यावल रोडवरील गोदामात धाड टाकून पुरवठा विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. यावेळी खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात शंभर कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. खडसे यांनी पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर राज्यभरातील स्वस्त धान्य गोदामांची चौकशी लागली मात्र यात बडे धेंड मोकळेच राहिले मात्र कनिष्ठ कर्मचार्यांवर कारवाई होवून नंतर हे प्रकरण थंबबस्त्यात पडले होते.