पुणे: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीला मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते.
पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात असेही अजित पवार यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचे नियोजन या सर्व महत्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा. त्यामुळे नियोजनात आणखी सुसुत्रता येईल. कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामिण क्षेत्र मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’ची गंभीर लक्षणे असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहीजेत असे स्पष्ट निर्देशही अजित पवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.