नवी दिल्ली । देशातील सर्वोच्च राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधीसूचना निघाल्यावर पहिल्याच दिवशी या पदासाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले. या यादीत मुंबईच्या पटेल दांपत्याचा समावेश आहे. मुंबईत राहणार्या सायराबानो मोहम्मद पटेल आणि मोहम्मद पटेल अब्दुल हमिद या दांपत्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर या दांपत्याने सांगितले की, दोघांपैकी एकाला राष्ट्रपती आणि दुसर्या उपराष्ट्रपती केल्यास बरे होईल.
पहिल्या दिवशी सहा अर्ज दाखल
तामिळनाडूचे के.के. पद्मराजन, मध्य प्रदेशातील आनंदसिंग कुशवाह, तेलंगणातील ए. बाला राज आणि पुण्याच्या विजयप्रकाश कोंडेंकर यांचा समावेश आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि युपीएने देखील आपल्या उमेदवाराचे जवळपास निश्चित केले आहे. विरोधी पार्टीतील नेते यासंदर्भात सतत बैठकी घेत आहे. दुसरीकडे भाजपने उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी तीन सदस्यांची समिती बनवली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी भाजपची त्रिसदस्यीय समिती लवकरच विरोधकांची भेट घेणार आहेत. एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार 23 जूनला जाहिर होण्याची शक्यता आहे.
मर्जीप्रमाणे मतदान
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाची निवडणुकप्रकिया 25 जुलैपर्यत व्हायला पाहिजे. या निवडणुकीसाठी राजकिय पार्टींना व्हिप जारी करता येत नाही. त्यामुळे आमदार, खासदार यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्याची सूट मिळते. भारतात राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरेट कॉलेज पद्धतीने होते. त्यात खासदार आणि आमदारांच्या मताला गुणांक दिलेले असतात. खासदार संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये मतदान करतात. राज्यातील आमदार विधीमंडळात मतदान करतात. घटनेतील अनुच्छेद – 55 नुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
नामांकन अर्ज रद्द होणार
राष्ट्रपतीपदासाठी पहिल्या दिवशी अर्ज दाखल करणार्या सर्व उमेदवारांचे अर्ज रद्द होणार आहेत. या सगळ्या उमेदवारांच्या अर्जावर मतदानसाठी पात्र असलेल्या खासदार, आमदारांपैकी कोणाचीही सूचक आणि अनुमोदक म्हणून सही नाही. सूचक आणि अनुमोदकासाठी आवश्यक असलेल्या 50 मतदारांची आणि त्यांच्या समर्थकांच्या सह्या नसल्यामुळे हे अर्ज बाद होतील. लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधीमंडळाचे सदस्य या निवडणूकीसाठी मतदार म्हणून पात्र असतात. राज्यातले आमदार आणि खासदार यांच्या संख्येवरून मतदारांचे गुणांक ठरविण्यात येते.
28 जून शेवटची तारीख
राष्ट्रपतीपदाच्या निवडणकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून आहे. त्यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलैला मतगणना होईल. यावेळी एकुण 776 खासदार आणि 4120 आमदार मतदान करतील.