मुंबईच्या परेलमध्ये साकारणार अनोखे भवन- राजकुमार बडोले
मुंबई –मुंबईतील परेल येथील बाबू जगजिवनराम मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवर संत रोहिदास भवन उभारण्यात येणार असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित रहाणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. संत रोहिदास भवनाच्या उभारणीसाठी 11 कोटी रूपयांचा निधीही वितरीत करण्यात आला असून येत्या दोन वर्षात भवनाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
परेल येथील संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई संचालित बाबू जगजीवनराम यांच्या नावाचे मागासवर्गिय मुलांचे वसतिगृह जीर्ण झाले होते. त्यामळे ते बंद होते. सदरील जीर्ण बांधकाम महानगरपालिकेच्या परवानगीने पाडण्यात आलेले आहे. सदरील मोकळ्या जागेवर संत रोहिदास भवनाची उभारणी करण्यात यावी, अशी रोहिदास समाज पंचायत संघाची अनेक वर्षांची मागणी होती. त्याला अनुसरून आम्ही दोन वर्षापूर्वी मुंबईच्या तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर, आमदार भाई गिरकर, आमदार अजय चौधरी, आमदार मंगेश कुडाळकर, माजी महापौर महादेव देवळे, तसेच रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष मयुर देवळेकर, उपाध्यक्ष गणेश चव्हाण, सरचिटणीस रवि पेवेकर यांच्या समवेत जागेची पाहणी करून संत रोहिदास भवन उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणाऱ्या 11 कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली. आता भूमीपुजनानंतर भवनाच्या प्रत्यक्ष उभारणीला वेग देण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले. बडोले म्हणाले की, संत रोहिदास भवनामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भव्य ग्रंथसंपदा असलेले वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल, तसेच मागासवर्गीय समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आजच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, ॲड. आशिष शेलार, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी महापौर महादेव देवळे आदि उपस्थित रहाणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.