‘त्या’ डंपर मालकाला सव्वा दोन लाखांच्या दंडाची नोटीस
जळगाव – जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी असतांनाही चक्क मुंबईच्या पावत्यांद्वारे जळगावात वाळूची अवैध वाहतुक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान सोमवारी पकडण्यात आलेल्या डंपर वाहन चालकाकडे मुंबईच्या पावत्या आढळुन आल्याने मोठी खळबळ उडाली. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर चौकशी केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी पात्रातुन वाळुची सर्रासपणे अवैध वाहतुक केली जात आहे. वाळु ठेके बंद असतांनाही ही वाहतुक होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हाभरात महसुल पथकाकडुन या वाळु तस्करांवर कारवाई होत असली तरी ‘अर्थकारणामुळे’ अवैध वाळू वाहतुकदारांचे चांगलेच फावले आहे
शेगावनंतर आता मुंबईच्या पावत्या
जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील पावत्यांचा वापर करून वाळुची अवैध वाहतुक केली जात आहे. सुरवातीला वाळु तस्करांकडुन शेगावच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. आता थेट मुंबईच्या पावत्यांचा वापर करून जिल्ह्यात वाळुची तस्करी केली जात आहे. सोमवारी तहसीलदार वैशाली हिंगे यांनी स्वत: शिरसोली रस्त्यावर एमएच-19 झेड-3757 या क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे डंपर पकडले होते. या पकडलेल्या डंपर वाहकाकडे मुंबईच्या पावत्या आढळुन आल्या आहेत. त्यामुळे जळगावात मुंबईच्या पावत्यांवर वाळूची अवैध वाहतुक होत असल्याचे समोर आले आहे.
डंपर मालकाला दंडाची नोटीस
तहसीलदार वैशाली हिंगे यांनी सोमवारी पकडलेल्या एमएच-19 झेड-3757 या क्रमांकाच्या डंपर मालकाला सव्वा दोन लाख रूपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दंड जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत पकडलेले डंपर सुटणार नसल्याचेही प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यात भुसावळ, धरणगाव, एरंडोल येथे मात्र पकडण्यात आलेली वाहने सोडुन देण्याची माहिती सुत्रांनी दिली.
साठा शिवडीला वाहतुक जळगावात
ज्या डंपरचालकाकडे मुंबईच्या पावत्या आढळुन आल्या त्यासंदर्भात प्रशासनाने प्राथमिक चौकशी केली असता मुंबईतील शिवडी येथे वाळु साठा करण्यात आला असुन मयुर एंटरप्रायझेसच्या नावे आहे. याठिकाणाहुनच पावत्याचा वापर करून वाळुची अवैध वाहतुक केली जात आहे. या पावत्यांवर कुठलाही इनव्हाईस नंबर नसल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान याबाबत अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
डंपर सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न
सोमवारी तहसीलदारांनी पकडलेले डंपर सोडविण्यासाठी संबंधित डंपर मालक व त्यांच्या साथीदारांकडुन जोरदार प्रयत्न केले जात आहे. मात्र तहसीलदारांनी दंडाची नोटीस बजावल्याने हे प्रयत्न अयशस्वी ठरण्याची चिन्हे दिसत आहे.