मुंबई । नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये होणार्या 19 वर्ष वयोगटाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली. या संघाच्या कर्णधारपदाची माळ मुंबईकर पृथ्वी शॉच्या गळ्यात पडली आहे. 13 जानेवारीपासून खेळल्या जाणार्या या विश्वचषक स्पर्धेत पंजाबचा फलंदाज शुभमन गिल संघाचा उपकर्णधार असेल. विशेष म्हणजे पृथ्वी आणि शुभमचा नुकत्याच संपलेल्या 19 वर्षे गटाच्या आशियाई अजिंंक्यपद स्पर्धेसाठी संघात निवड करण्यात आली नव्हती. भारतीय संघाचा एक जादा विकेटकीपर निवडण्यात आला आहे. आर्यन जुवाल हा संघातील जादा विकेटकीपर असेल. हार्विक देसाई हा संघातील नियमित विकेटकिपर आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे 8 ते 22 डिसेंबरदरम्यान बंगळुरुत सराव शिबिर होणार आहे. पृथ्वी शॉ आणि बंगालचा वेगवान गोलंदाज इशान पॉरेल सध्या आपापल्या स्थानिक संघामधून रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळत आहेत.
त्यामुळे हे दोघेही 12 डिसेंबर रोजी सराव शिबिरात सहभागी होतील. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशात झालेल्या या स्पर्धेत वेस्टइंडिजने भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्याआधी भारतीय संघाने 2000, 2008 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
भारतीय संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभमन गिल, मनजोत कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुयाल (विकेटकिपर), हार्विक देसाई (विकेटकिपर), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पॉरेल, अर्शदीप सिंग, अनुकुल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव.