मुंबईच्या भेंडीबाजारमध्ये सात मजली इमारत कोसळली; 21 जणांचा मृत्यू

0

मुंबई । मुंबईतील भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीटवर म्हाडाची उपकरप्राप्त असलेली हुसेनी ही सात मजली इमारत कोसळून दुर्घटना आज सकाळी घडली . इमारतीच्या ढिगार्‍याखाली 60 ते 65 रहिवासी अडकल्याची भीती असून . इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या 34 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दल व एनडीआरएफला यश आले. या दूर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला झाला असून 13 जण जखमी आहेत. बचाव कार्य करणारे मुंबई अग्निशमन दलाचे पाच आणि एनडीआरएफचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्याच जे.जे. आणि सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इमारत पुरातन
मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसेनी (आरसी वाला) बिल्डिंग 117 वर्ष जुनी इमारत होती. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ – साडे आठच्या सुमारास कोसळल्याची माहिती आहे. इमारतीत तळ मजल्यावर अनिवासी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यावर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण 10 खोल्या आहेत. इमारतीत 9 कुटुंब राहत असून प्राथमिक माहितीनुसर 60 ते 70 लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ढिगार्‍याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु झालं आहे. एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. ढिगार्‍याखालून लोकांना बाहेर काढले जात आहे.

कारण स्पष्ट नाही
इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर इमारत सैयदना बुर्‍हानुद्दीन ट्रस्ट च्या पुनर्विकासामध्ये प्रकल्पामध्ये होती. इमारतीला 353 ची नोटीस बजावण्यात आली होती. इमारतीच्या पुनर्विकासाकरिता सदर रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र रहिवाश्यांनी घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने ते त्याच ठिकाणी राहत होते. सकाळी इमारत कोसळली त्यावेळी इमारतीमधील शाळा सुरु असती तर मोठ्या प्रमाणात लोक आणि लहान मुले अडकली असती अशी भीती येथील स्थानिक रहिवाश्यांनी बोलून दाखवली. या ठिकाणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट दिली असून या दुर्घटनेला म्हाडा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करुन दूर्घटनेची माहिती घेतली,जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश, दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत, देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची केली आहे.

जखमींवर उपचार
पालिकेच्या आपतकालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगार्‍या खालून 34 लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी जेजे हॉस्पिटलमध्ये 8 पुरुष व 1 महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयातून 2 पुरुष आणि 1 महिलेला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जेजे रुग्णालयातून एका रुग्णाने स्वतः डिस्चार्ज घेतला त्याने सैफी रुग्णालयात दाखल झाला आहे. बचाव करणार्‍या अग्निशमन दलाचे 5 आणि एनडीआरएफचा 1 असे सहा जावं जखमी झाले असून 2 जवानांना जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर 4 जवानांना उपचार कलारून सोडण्यात आले आहे.