मुंबई – मुंबई महापालिकेत आपला महापौर बसविण्यास भारतीय जनता पार्टी उत्सुक असून येत्या आठ मार्चला होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आपलाही उमेदवार उतरविणार असल्याचे वृत्त आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत २२७ जणांच्या सभागृहात शिवसेनेचे ८४ तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या. काँग्रेसला ३१ तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिलाल्या. समाजवादी पार्टीला सात तर एम.आय.एम.ला तीन जागा मिळाल्या. उरलेल्या ११ जागा इतर व अपक्षांना मिळाल्या. अपक्ष नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक ४१ मधील नगरसेवक तुळशीराम शिंदे तसेच प्रभाग क्रमांक १२३ च्या नगरसेविका स्नेहल मोरे या अपक्ष नगरसेवकांनी (शिवसेनेतील बंडखोर) शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यापाठोपाठ अपक्ष नगरसेवक किरण लांडगे (प्रभाग क्र. १६०) आणि चंगेज मुलतानी (प्रभाग क्र. ६२) यांना आपल्या बाजूने उभे करण्यात शिवसेनेला यश आले. या चार अपक्ष नगरसेवकांसह मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी निवडून आलेल्या पक्षाच्या नगरसेवकांना नवी मुंबईत कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात नेले. तेथे या ८८ नगरसेवकांचा एक गट म्हणून नोंद करण्यात आली. आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी शिवसेनेने ही खेळी केल्याचे बोलले जाते. यानंतरही शिवसेनेने मुमताझ खान, या आणखी एका अपक्ष नगरसेविकेला (प्रभाग क्र. १०२) आपल्या बाजूने वळविल्याचे वृत्त आहे.
एकीकडे या घडामोडी सुरू असतानाच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना स्पष्ट केले की, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि जे बोलत नाही ते नक्कीच करून दाखवतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर गुरूवारी ठाण्यात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेल्या भाजपाने महापौर पदाच्या निवडणुकीत उडी घेतली. मुंबईत शिवसेनेवर युती करण्यासाठी दबाव वाढविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरूवातीला होती. त्यातच अखिल भारतीय सेनेच्या एकमेव नगरसेविका गीता गवळी यांना मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावल्याचे कळते. त्याआधी गवळी सेनाभवनावर शिवसेनेचे नेते अनिल देसाई तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून परतल्या. त्यात त्यांनी एक वर्ष आरोग्य समितीचे अध्यक्षपद आणि पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्यत्व मागितल्याचे बोलले जाते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा गुरूवारी विवाह होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी स्वतः ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रित केले होते. पण, ठाकरे यांनी जालन्याला जाण्याऐवजी कोल्हापूरला आमदार क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाहाला जाणे पसंत केले. यावरून शिवसेना भाजपापासून दूरच राहत असल्याचे स्पष्ट होते.
महापौर पदाची निवडणूक ही सभागृहातली बहुमतावर अवलंबून असते. यात कोणत्या पक्षाचे नगरसेवक जास्त आहेत, याला महत्त्व नसते. त्यामुळे भाजपाही या निवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याचे बोलले जाते. आयत्या वेळी शिवसेनेबरोबर समझोता झालाच व महापालिकेत युती झाली तर पहिली अडीच वर्षे शिवसेनेला महापौरपद सोडण्यास तयार होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. येत्या चार तारखेला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा दिवस आहे. त्यावेळी भाजपाने आपला उमेदवार दिल्याचे दिसून येईल, असे सूत्रांनी सांगितले.