खेड : मुंबईच्या विकासामध्ये बहुसंखेने असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील डबेवाले कामगारांचाही खूप मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केले. मुंबईचा डबेबाला ही मुंबईची खास ओळख आहे. याच डबेवाल्यांची ओळख सातासमुद्रापार देखील पोहोचली आहे. याचीच दखल घेत मुंबई पालिकेने ’काम करणारा डबेवाला’ पुतळा हाजीअली जंक्शन (मुंबई) येथे उभारला आहे. मुंबई डबेवाले संघटनेने शुक्रवारी (दि. 31) हाजी अली चौकात भव्य दिव्य डबेवाल्याचे शिल्प अर्थात पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ते बोलत होते.
कामगारांमुळे मुंबईचा विकास
यावेळी मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता, डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर, डबेवाला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे व सर्व डबेवाले संघटनेचे सदस्य आरपीजी आर्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गोरे पुढे म्हणाले की, मुंबईकर चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेणारे डबेवाले म्हणजे मुंबई शहरातील श्रम संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. मुंबईचा खरा विकास कोणी केला असेल तर तो कामगारांनीच, त्यांनी आपल्या कष्टाने मुंबईची उद्योगनगरी केली.
सव्वाशे वर्ष योगदानाची दखल
या मुंबईच्या विकासामध्ये बहुसंखेने असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील डबेवाले कामगारांचाही खूप मोलाचा वाटा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, आचारसंहितेमुळे या पुतळ्याचे अनावरण मागील काही दिवसांपासून होऊ शकले नव्हते. अखेर त्यास शुक्रवारी मुहूर्त मिळाला. मुंबईतील नोकरदारांसाठी जेवणाच्या डब्याची ने-आण करणार्या आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापनाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आणि गेली सव्वाशे वर्षे मुंबईत काम करणार्या मुळच्या उत्तर पुणे जिल्ह्यातून बहुसंखेने असलेल्या या मुंबईच्या डबेवाल्यांची दखल महापालिकेनेही घेतल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातून आनंद व्यक्त होत आहे.