मुंबईच्या विजयाचा आनंदोत्सव!

0

मुंबई । अतिशय रोमांचक आणि थरारक ठरलेल्या अंतिम लढतीत पुणे सुपरजायंट्सला नमवून तिसर्‍यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा करणार्‍या मुंबई इंडियन्स संघासोबत सध्या एकापेक्षा एक आनंदाच्या गोष्टी घडत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मिडीयावर एकीकडे मुंबईच्या विजयाचे समर्थन सुरु असतानाचा पुण्याच्या चाहत्यांनी देखील संघाला डोक्यावर घेतले तर विजयाचे अफाट सेलिब्रेशन झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या आस्थेचे दर्शन घडवले. मुंबई इंडियन्सचे फ्रॅन्चायझी अनंत अंबानी यांनी आयपीएलच्या ट्रॉफीसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत आयपीएलची ट्रॉफी बाप्पांच्या चरणी अर्पण केली. गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत करत आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा करत तिसर्‍यांदा चषकावर आपले नाव कोरले आहे.

बटलरचा अतिउत्साही जोश!
आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळविल्यानंतर मुंबई पुण्यासह इंग्लंडमध्येही मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन करण्यात आले. मुंबईच्या विजयाच्या आनंदाने इंग्लडचा क्रिकेटर जोस बटलरचे भान हरपल्याचे दिसले. अंगावर फक्त टॉवेल घेऊन सामना पाहण्यास बसलेला बटलर मुंबईच्या विजयानंतर विवस्र झाला. त्याने खुद्द फेसबुक अकाऊंटवरुन मुंबईच्या विजयानंतरचा आनंदी क्षण शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. अर्ध्यातूनच माघारी गेलेल्या बटलरने सामन्याचा मायदेशात आनंद घेतला.

पत्नी माझ्यासाठी लकीचार्म : रोहित फायनलमध्ये पुण्यावर रोमांचक विजय मिळविल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला झालेला आनंद पाहण्यासारखा होता. रोहितने सामन्यानंतर पत्नी रितिका सजदेह सोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत एक ओळ लिहीताना त्याने पत्नीला लकी चार्म म्हटले आहे. रितिका मुंबई इंडियन्सच्या बहुतांश सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित होती. रोहितला साथ देण्यासाठी तिने संघासोबतच प्रवास केला.

जॉन्टी र्‍होड्ससाठी दुहेरी आनंदाचा दिवस
मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी र्‍होड्ससाठी रविवारचा दिवस दुहेरी आनंदाचा ठरला. एकीकडे संघाने विजेतेपदावर नाव कोरले तर संध्याकाळी जॉन्टीची पत्नी मिलानी हिने पुत्राला जन्म दिला. याआधी जॉन्टीच्या पत्नीने भारतातच एका मुलीला जन्म दिला होता. भारतात जन्मल्याने जॉन्टीने तिचे नाव इंडिया असे ठेवले होते. पत्नीच्या प्रसुतीवेळी जॉन्टी तिच्यासोबत नव्हता. काल मुंबई इंडियन्स आणि पुणे सुपरजायंट्स यांच्यातील आयपीएलच्या अंतिम लढतीसाठी तो हैदराबादला गेला होता. दरम्यान मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये जॉन्टीच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. प्रसुती झाल्यावर जॉन्टीने ट्विटरवरून जगभरातील चाहत्यांना कळवली.23 एप्रिल 2015 रोजी आयपीएल सुरू असतानाच जॉन्टीच्या पत्नीने भारतातच मुलीला जन्म दिला होता.