मुंबईतील आणखी तीन तरुण आयएसआयच्या संपर्कात

0

मुंबई । पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या संपर्कात आल्याच्या संशयातून मुंबईतील आणखी तीन तरुण उत्तरप्रदेश एटीएसच्या रडारवर आहेत. यूपी एटीएसच्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या तिघांचा शोध सुरू केला आहे. अल्ताफ कुरेशी आणि जावेद नविवाला या दोघा संशयितांच्या अटकेनंतर यूपी एटीएसचा संशय बळावला आहे.

मुंबईतील जावेद नविवाला हा आयएसआय एजंट आफताबला पैसे पुरवत होता. त्याच्या चौकशीतून काही महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. मुंबईतील आणखी तीन तरुण जावेद नविवाला याच्या संपर्कात होते. ते तिघेही आयएसआयसाठी काम करत असावेत असा यूपी एटीएसला दाट संशय आहे. या तिघांना शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जावेद नविवालाने काही दिवसांपूर्वीच आफताबची भेट घेतली होती. तसंच तो दुबईलाही जाऊन आला आहे असेही एटीएसने स्पष्ट केले आहे. अटकेनंतर पहिल्यांदाच उत्तरप्रदेश एटीएसचं पथक अल्ताफ, जावेद आणि आफताब या तिघांची एकत्र कसून चौकशी करणार आहेत. या तिघांनी आयएसआयसाठी कोणती कामे केली आहेत याची माहिती चौकशीतून उघड होणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून नुकतंच जावेद नाविवाला या खडख एजंटला अटक केली आहे. जावेदला आग्रीपाड्यातून अटक करण्यात आली. यापूर्वी एटीएसने फैजाबाद आणि मुंबईतून दोन पाकिस्तानी गुप्तहेर आफताब अली आणि अल्ताफ कुरेशी यांना अटक केली होती. यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने काल नागपाड्यातून आयएसआय एजंट अल्ताफ कुरेशीला अटक केली होती. त्याच्याकडे तब्बल 70 लाख रुपये सापडले होते. त्यानंतर त्याचा साथीदार जावेद यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अल्ताफच्या चौकशीतूनच जावेदला पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जावेदला पाकिस्तानने पैसे जमा करण्याचे काम सोपवले होते. त्याच्या सांगण्यावरूनच अल्ताफ कुरेशी याने खात्यात पैसे जमा केले होते.