सराफा बाजारात दरोडा टाकण्यापूर्वीच उधळला डाव : चौघा आरोपींना अटक : दरोड्याच्या साहित्यासह सॅन्ट्रो कारही जप्त
भुसावळ- भुसावळातील सराफा बाजारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मुंबईहून आलेल्या चार जणांच्या कुविख्यात दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेला यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहनासह दरोड्याचे साहित्य व घातक शस्त्र जप्त करण्यात आले असून आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहीद्दीन शेख निजामुद्दीन शेख (40, रा.काझी वाडा, पाईप लाईन साकी नाका, मुंबई), शाकीर हैदर शेख (40, रा.मुंबरा देवी रोड, मुंबई), अफलोज इस्लाम शेख (23, रा.नालासोपारा, धानु बाग, मुंबई), हुसेन मोहंम्मद रफीक शेख (28, रा.अंधेरी, रमाबाई चाळ रु.नं.65 अंधेरी, मुंबई) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. दरम्यान, या टोळीतील एक संशयीत पसार झाला असून त्याचाही कसून शोध सुरू आहे.
पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा पळ : संशयावरून केली अटक
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे गस्तीपथक रविवारी मध्यरात्री गस्तीवर असताना खडका चौफुलीवर वरणगावकडून भरधाव वेगाने चारचाकी (एम.एच.01 एम.ए.8138) येत असल्याने पोलिस पथकाने तिला थांबण्याचा इशारा केला असता वाहनधारकाने सुसाट वेगाने वाहन पळवले असता पोलिस पथकाला संशय आला. या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर नाहाटा चौफुलीवर असलेल्या गतिरोधकाजवळ या वाहनाचा वेग कमी झाल्याने पोलिस पथकाने दुचाकी या गाडीसमोर लावल्यानंतर संशयीत जामनेर रोड व जळगावच्या दिशेने पळू लागले तर एकाने पोलिसांवर चॉपर उगारून आमचा पाठलाग केल्यास कापून टाकण्याची धमकीही दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी नांग्या टाकल्यानंतर त्यांना बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी सराफा बाजारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली.
दरोड्याचे साहित्य केले जप्त
आरोपींच्या ताब्यातून लोखंडी कटर, अॅडजेस्ट टेबल लोखंडी पाना, दोन स्क्रु ड्रायव्हर, एक लोखंडी पाते असलेले हॅक्साब्लेड, दोन बॅटरी, 16 इंच लांबींचे चॉपर, 18 इंच लांबीचा लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, लहान चाकू, तीन हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल,सोन्याचे दागिने मोजायाचा काटा, सात हजार 450 रुपयांची रोकड, 260 रुपयांची चिल्लर, एक मिरचीची पिशवी, नॉयलॉन दोरी व एक लाख रुपये किंमतीची सॅन्ट्रो कार मिळून एक लाख 10 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ डीबी पथकातील पोलिस उपनिरीक्षक निशीकांत जोशी, सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, तस्लिम पठाण, हवालदार युवराज नागरुत, नाईक सुनील थोरात, नरेंद्र चौधरी, दीपक जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, विनोद वितकर आदींच्या पथकाने केली.
कुविख्यात दरोडेखोरांवर डझनभर गुन्हे
आरोपींची पोलिसांनी कुंडली काढली असता कळव्यातील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात शाकीर हैदर शेख हा अट्टल गुन्हेगार असल्याची मातिी मिळाली शिवाय त्याच्याविरुद्ध जे.जे.मार्ग पोलिस ठाणे तसेच मुंबई शहरात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, चोरीचे एकूण 20 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले तर अफलोज ईस्लाम शेखविरुद्धही चोरी-घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.