मुंबई । नालेसफाई न झाल्याने मुंबईत पाणी साचले असा आरोप कुणी करत असेल तर तो खोटा आहे. मुंबई ठप्प झाली हे मी मान्य करतो, मात्र हे नैसर्गिक संकट असून या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हा प्रश्न विचारण्यापेक्षा ही परिस्थिती महापालिकेने कशी हाताळली हे महत्त्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नालेसफाई योग्य पद्धतीने झाली म्हणूनच मुंबईत पाणी कुठे साचून राहिलेले नाही असेही उद्धव म्हणाले.
विरोधकांनी राजकारण करू नये
नाले सफाई झाली नाही असे ज्यांचे म्हणणे आहे अशांनी मुंबईतील नाल्यांमध्ये उतरून गाळ काढून दाखवावा असे आव्हान ठाकरे यांनी टीका करणार्या विरोधकांना केले. मुंबईतील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे कुणीही राजकारण करू नये, असेही ठाकरे म्हणाले. आजची मुंबई पूर्वपदावर आलेली दिसते ते महापालिकेचे कर्मचारी आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून काम केले म्हणूनच असे म्हणत उद्धव यांनी कर्मचार्यांच्या कामाचे कौतुक केले.
अतिवृष्टीमुळे मंगळवारी मुंबईतील जनजीवन कोलमडले होते. बुधवारीही ते विस्कळीत होते. सायन येथे पावसाच्या पाण्यात अडकलेल्या एका कारमध्ये प्रियन (30) या वकीलाचा मृतदेह सापडला. पालघर जिल्ह्यातही जनजीवन विस्कळीत होते. अनेक ठिकाणी पुरसदृस्य परिस्थिति निर्माण होऊन 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक बेपत्ता आहेत. मुंबईत मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता आहेत. रेल्वेची वाहतूक अंशत: सुरू झाली, मात्र ती पूर्वपदावर आली नव्हती.