मुंबई । शहरात अमली पदार्थविरोधी पथकाकडून शहरात विकण्यात येणार्या अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यात गांजाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनातून पुढे आले आहे. मुंबई शहरासह त्याच्या उपनगरात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईसह इतर उपनगरामध्ये स्वस्तात आणि अगदी सहजपणे गांजाचा पुरवठा केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
मुंबईतील गोवंडी, शिवाजी नगर, बांद्रा, जोगेश्वरी, मालाड, मालवणी सारख्या झोपडपट्टी परिसरात गांजाची सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालयात शिकणारे तरुणतरुणी सध्या गांजा सेवनाच्या आहारी गेले असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. शहरातील काही महाविद्यालयीन तरुणांमध्ये दारुसोबत गांजाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही दिसून आले आहे. एकदंरीतच मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये गांजाला वाढती मागणी असल्याचे दिसून आले आहे. गांजा तस्करांवर केलेल्या काही कारवाया.
अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाया
डिसेंबर 2017 – घाटकोपरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून आशा उर्फ नम्रता कदम या महिलेला अटक, 1.62 लाखांचे बंदी असलेले ‘कफ सीरप’ जप्त केले.
डिसेंबर 2017 – मालाडमधील कुरार पोलिसांनी अर्धा किलो गांजासह साखराबाई काळे या 35 वर्षीय महिलेला अटक केली.
जानेवारी 2018 – मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने 2.7 लाखांचे हेरॉइनसह एक महिला व 4.5 लाखांच्या अमली पदार्थासह आणखी एका महिलेला अटक.
डिसेंबर 2018 – ओशिवरा पोलिसांनी जसूबाई चावडा या महिलेला अटक करून 2 किलो गांजा जप्त केला होता.
13 मार्च 2018 – इस्टर्न फ्री वेवर कांजूरमार्ग येथून 500 किलो गांजा जप्त, आरोपी संजय मोहिते, नंदलाल बेलदर, कालू मोहिते यांना अटक.
31 मार्च 2018 – शाहूनगर पोलिसांकडून गिरीश यादव या आरोपीला गांजाबाबत अटक.