मुंबई (निलेश झालटे):- कर्जमाफीच्या निर्णयानंतर विविध प्रकारच्या आरोपांनी घेरलेले सरकार आता नव्या आकडेवारीने अजून टीकेचे धनी झाले आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी नुकतीच जाहीर करून शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केले. यासंदर्भात जिल्हानिहाय शेतकऱ्यांची आकडेवारी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून एकदशीच्या शुभमुहूर्तावर रात्री १२ वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये विशेष मेट्रोसिटी मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख आकडेवारीत केला गेल्याने सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नासारखाच मुंबईतील ‘ते’ शेतकरी कोण? हा प्रश्न चर्चिला जात आहे. टीकेचे धनी झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुंबईत शेतकरी आहेत का? हा मलाही पडलेला प्रश्न असल्याची प्रतिक्रिया दिल्याने कर्जमाफीच्या मुद्द्याकडे सरकार किती गांभीर्याने पाहत आहे यावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान प्रश्नांची सरबत्ती उडाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील या शेतकऱ्यांची यादी मागविली असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्वीटनंतर गोंधळ सुरु
मुख्यमंत्र्यांच्या सीएमओ ऑफिशियल या अकाऊंटवरून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. या यादीत मुंबई शहरातील 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगरातील 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचे सांगितले आहे. यानंतर मुंबईतील कर्जमाफी झालेले ते 813 शेतकरी कोण? असा प्रश्न आता महाराष्ट्रातील शेतकरी तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना देखील पडला आहे. या आकडेवारीवरून मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करत असून, राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने’अंतर्गत मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे.
मुंबईत शेतकरी आहेत कुठे?
मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हानिहाय कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी ट्विटरवरुन जाहीर केल्यानंतर लोकांनीही या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शेती करतात त्यांना कर्जमाफी का?, मुंबईमधे कर्जमाफी कशी काय? मंत्रालयाच्या गच्चीवर शेती केली जात आहे वाटते? असे सवाल उपस्थित करत सरकारवर निशाणा नेटकऱ्यांनी साधला आहे. मुंबईत शेतकरी आहेत का? हा मलाही पडलेला प्रश्न असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जाहीर केलेली यादी ही प्रस्तावित लाभार्थ्यांची असू शकते असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ती नावे जाहीर करा
या यादीत मुंबई शहरातल्या ६९४ आणि मुंबई उपनगरातल्या ११९ अशा एकूण ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पण मुंबईमध्ये शेतकरी कुठून आले असा प्रश्न उपस्थित करत या शेतकऱ्यांची नावेही जाहीर करण्यात यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. या जाहीर केलेल्या यादीमधले लाभार्थी प्रस्तावित आहेत. या सगळ्याची पूर्ण चौकशी केल्यानंतरच कर्ज माफ केले जाईल, असे सांगत यादी मागीविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची आकडेवारी खोटी असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा निहाय कर्जमुक्तीच्या लाभार्थींची आकडेवारी जाहीर केली. मात्र यानंतर राज्यभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीवर आधीपासूनच शंका उपस्थित आहे. शिवसेनेने देखील लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जाहिर करण्याची मागणी केली होती.
सर्वाधिक लाभ कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्याला
मुख्यमंत्र्यांच्या यादीनुसार सर्वाधिक लाभार्थी हे कृषिमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात असून त्या खालोखाल यवतमाळ जिल्हात कर्जमुक्तीच्या योजनेचे लाभार्थी आहेत. बुलढाण्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. त्यानंतर यवतमाळ २ लाख ४२ हजार ४७१ आणि बीडमधील २ लाख ८ हजार ४८० शेतकरी लाभार्थी आहेत. पुणे जिल्ह्यात १ लाख ८३ हजार २०९ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार ३२० शेतकऱ्यांना तर धुळे जिल्ह्यातील ७४ हजार १७४ तर नंदुरबार जिल्ह्यात ३३, ५५६ शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी या ट्वीटद्वारे केला आहे.
मुंबईतल्या या शेतक-यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली आहेत. या शेतकऱ्यांची जमीन मुंबईलगत असू शकते. त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले असू शकेल. आम्ही ही यादी मागविली असून संपूर्ण चौकशीनंतरच त्यांना कर्जमाफी दिली जाईल.
बॅंकि़ग समितीच्या आकडेवारीत मुंबई शहर आणि उपनगरातील थकीत शेतक-यांची आकडेवारी नाही. मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत मुंबईतील शेतकरी कसे आले. कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने केली गेली आहे.
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
मुंबई आणि परिसरातील कर्जमाफी झालेले शेतकरी –
मुंबई शहर – ६९४
मुंबई उपनगर – ११९
ठाणे – २३५०५
पालघर- ९१८