मुंबई : दक्षिण विभागातील क्रॉफर्ड मार्केट येथील मदनी इंग्लिश स्कूल आणि माटुंगा येथील अमुलख अमिचंद इंटरनॅशनल या दोन शाळा बंद करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत, असे शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता अथवा ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र, दक्षिण विभागातील मदनी इंग्लिश स्कूल, साबु सिदीक्की मुमसाफिरखा, क्रॉफर्ड मार्केट आणि अमुलख अमिचंद इंटरनॅशनल स्कूल, अहमद किडवाई रोड, माटुंगा या दोन शाळा अनधिकृतपणे सुरु होत्या. त्यांच्या व्यवस्थापनाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे व शाळा बंद करावी. जेणेकरुन नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच, पालकांनी आपल्या पाल्यांचे संबंधित शाळेत प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहनही शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.