मुंबईतील धोकादायक इमारती बनल्या शवपेट्या

0

तसे म्हटले तर घाटकोपरमधील कोसळलेली चार मजली इमारत धोकादायक नव्हती. मात्र, तेथील लॅण्ड माफिया शितप याने तळमजल्यामध्ये नर्सिंग होम उभारण्यासाठी केलेल्या तोडाफोडीच्या कामाने ही इमारत कधी धोकादायक बनली, ही महापालिकेच्या अधिकार्‍यांनाही समजले नाही. यात शितप यांनी म्हणे इमारतींचे पिलरच उघडून टाकले होते. दुर्घटना घडण्याच्या 4 दिवस आधी महापालिकेचे अधिकारी या इमारतीला भेट देऊन गेले, पाहणी केली. मात्र, त्यांना शितप यांचे तोडकाम दिसले नाही, त्यांनी इमारत सुरक्षित असल्याचा हवाला देऊन टाकला. आता चौकशीत या अहवालाची चिरफाड होईल, तेव्हा यामागील गौडबंगाल समोर येईल. पण प्रश्‍न इथे उपस्थित होतो की, मुंबईत हजारो इमारतींमध्ये सुशोभीकरणासाठी दररोज तोडाफोडीचे काम सुरू असते. त्यावर आता काही निर्बंध किंवा नियमावली बनवण्याची गरज बनली आहे, एखाद्या कुणाच्या हट्टापायी किंवा हौशेपोटी अवघ्या इमारतीमधील नागरिकांंचे जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काम करण्याआधी संबंधित सोसायटीबरोबर आता तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेचीही परवानगी घेणे बंधनकारक करणे गरजेचे बनले आहे.

घाटकोपरमधील साईदर्शन इमारत नेमकी पावसाळ्यात कोसळल्यामुळे धोकादायक इमारतींचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यंदाच्या पावसाळ्याआधी महापालिकाने मुंबईत एकूण 791 इमारती राहण्यासाठी धोकादायक असल्याचे जाहीर केले होेते. याचा थेट अर्थ होतो की, या इमारती ताबडतोब रिकाम्या करणे. मात्र, दुर्दैवाने निवार्‍याची दुसरी पर्यायी सोय नसणे किंवा मुंबई शहरातील ही जागा सोडली तर ती पुन्हा मिळेलच याची शाश्‍वती नसणे, यामुळे रहिवासी महापालिकेच्या नोटीसकडे सपशेल दुर्लक्ष करून कुटुंबकबिला घेऊन धोकादायक इमारतीमध्ये राहतात. लोक इतके निडर बनले आहेत की, महापालिकेच्या नोटीसविरोधात अनेक रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे तब्बल 145 इमारतींची प्रकरणे कोर्टात असून 21 प्रकरणे रहिवाशांच्या कमिटीकडे आहेत.

दरम्यान, 791 पैकी सर्वात जास्त धोकादायक इमारती कुर्ला भागात आहेत. त्यापाठोपाठ घाटकोपर एन वॉर्ड, माटुंगा, दादर, शीव, अंधेरी परिसरातील इमारतींचा या यादीत समावेश आहे. वॉर्डनिहाय धोकादायक इमारतींची संख्या पाहिल्यास कुर्ला एल वॉर्ड-113, घाटकोपर एन वॉर्ड-80, माटुंगा, दादर, सायन एफ उत्तर वॉर्ड-77, अंधेरी के पूर्व-50 अशी आहे. अशीच परिस्थिती मुंबई शहरालगत कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई शहरांची आहेे. ऑगस्ट 2016मध्ये भिवंंडीत एक धोकादायक इमारती कोसळली होती, त्याआधी आणखी एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. ठाण्यातील मुंब्रा भागातील बेकायदा इमारत कोसळून 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या सर्व मनपा क्षेत्रात बहुतांश भाग हा गावठाण आहे. या ठिकाणी बेसुमारपणे बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या इमारती मुळातच धोकादायक आहेत, 4-5 लाखांमध्ये या ठिकाणी घरे विकली जातात म्हणून हजारो लोक येथे राहायला आलेली आहेत. म्हणून हा एक नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेने 315 धोकादायक इमारती घोषित केल्या असून, त्यातील 53 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 28 हजार रहिवासी राहत असून, त्या रिकाम्या करण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली असून यात क प्रभाग क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 130 अतिधोकादायक इमारती आहेत. पालिकेच्या एकूण दहा प्रभागांत अतिधोकादायक 245 इमारती आहेत, ज्या ताबडतोब पाडण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान घाटकोपर दुर्घटनेनंतर हा विषय पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत चर्चेला आला. तेव्हाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्ट्रकचरल ऑडिटचे तुणतुणे वाजवले. जेव्हा जेव्हा इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तेव्हा तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितले. ठोस उपाययोजना करायला कुणी तयार नाही. क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय कासवगतीने पुढे सरकत आहे. पुनर्विकासाच्या मुद्द्याला गती मिळत नाही. मुंबईतील इमारतींच्या डिम कन्वेअन्स सर्टिफिकेटचा विषय आता मार्गी लागला आहे. अशाप्रकारे हळूहळू उपाययोजना होणार असतील, तर इमारत दुर्घटना थांबणे अशक्य आहे.
नित्यानंद भिसे – 8424838659