मुंबई : मुंबईतील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी दहिसर, मिठी, पोईसर, ओशिवरा या चार नद्यांच्या बाबतीत बृहत आराखडा 6 महिन्यात तयार करावा. त्यासाठी लोकांकडून सूचना व हरकती मागवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
वर्षा झाली बैठक
मुंबईतील चार नद्यांच्या विविध समस्यांबाबत रिव्हर मार्च व अन्य सामाजिक सस्थांच्या प्रतिनिधींची बैठक वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीफडणवीस बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री योगेश सागर, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी, अमृता फडणवीस, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. एन. अनबलगन उपस्थित होते.
नद्यांच्या भोवती संरक्षण भिंत
मुख्यमंत्री म्हणाले, मिठी नदीप्रमाणेच उर्वरीत तिन्ही नद्यांच्या बाबतीत संयुक्त प्राधिकरण स्थापन करणार असून मलप्रवाह उपचार संयंत्रासाठी (एसटीपी) आयआयटी मुंबई तसेच नीरीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नद्यांमधील संरक्षण भिंतीसाठी काँक्रिटीकरण करण्याऐवजी गॅबीयन टाईपचे स्ट्रक्चर उभे करुन काँक्रिटला पर्याय उपलब्ध करुन द्यावा. डेब्रीजच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने रिसायकलींग प्लान्ट तयार करावा, असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.
2005 सालीच्या आठवणी अजून ताज्या
दरम्यान वर्ष 2005 साली मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मिठी नदीला महापूर आला होता. त्यानंतर खरे तर कुर्ला, सांताक्रूझ येथून प्रदूषित झालेला तो नाला नसून ती मिठी नदी होती, असा साक्षात्कार अनेकांना झाला होता. त्यावेळी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती. त्यानंतर मुंबईत अशा चार नद्या असल्याचीही चर्चा सुरू झाली, त्यांचेही नाल्यात रुपांतर झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या सर्व नद्यांना पुनर्जीवित करण्याचा शासन पातळीवर विचार सुरू झाला, मात्र तेव्हापासून आज 12 वर्षे झाली तरी मिठी नदीतील प्रदूषण अद्याप कमी करता आले नाही, ही शोकांतिका आहे.