मुंबई। फेसबूक आणि ई-मेल नंतर हॅकर्सनी आता व्हॉट्सअॅपला लक्ष्य केले आहे. मुंबईच्या परेलमध्ये राहणार्या एका 30 वर्षीय महिलेचे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची तक्रार तिने काळाचौकी पोलिसांकडे केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. नेहा जैन या महिलेने 13 फेब्रुवारीला व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची तक्रार केली. तिचे फेसबूक अकाउंटही हॅक झाले आहे.
पैशाची मागणी केल्याने प्रकरण उघड
हॅकरने नेहाचे अकाउंट हॅक करून तिच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून पैशांची मागणी केली. मला पैशांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे माझ्या पेटीएम अकाउंटमध्ये लवकरात लवकर 5000 रुपये टाका असा मेसेज हॅकरने महिलेच्या मित्रांना टाकला. 8 फेब्रुवारीला नेहाच्या एका मैत्रिणीने तू पैसे का मागत आहेस हे विचारण्यासाठी फोन केला असता सर्व प्रकार नेहाच्या लक्षात आला. त्यानंतर लिंक पाठवणार्या नंबरवर तिने कॉल केला असता मला कोणतेही पोलीस पकडू शकत नाही अशी धमकी हॅकरने तिला दिली. सध्या सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहे.
मेसेजला उत्तर दिल्याने वॉटस्अप हॅक
हॅकरने नेहाच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला त्यामध्ये एक लिंक होती. अनोळखी नंबरवरून मेसेज आला म्हणून महिलेने मेसेज कोणी पाठवला हे पाहण्यासाठी त्या नंबरचा प्रोफाइल फोटो बघितला तर तो फोटो तिच्या जवळच्या व्यक्तीचा होता. त्यामुळे तिने ती लिंक कॉपी-पेस्ट करुन मेसेजला उत्तर दिले आणि नंतर तिचे फेसबूक आणि व्हॉट्सअॅप हॅक झाले.