मुंबईतील मॅनहोलला सुरक्षित जाळ्या बसवल्या जाणार

0

मुंबई । पाच महिन्यांपूर्वी मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर अमरापूरकर यांच्या झालेल्या मृत्यूनंतर मॅनहोलबाबत मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोलना नव्या आकाराची जाळी लावण्याचे काम पालिका युद्धपातळीवर हाती घेणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 मे पूर्वी 1,800 मॅनहोलना जाळी लावण्याचे काम पूर्ण केले जाणार असून लवकरच त्याची निविदा काढली जाणार आहे. मुंबईतील सुमारे एक लाख मॅनहोलना टप्प्याटप्प्याने जाळी लावली जाणार असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

7-8 हजारांत एक जाळी
प्रथम दादर, हिंदमाता, परेल, मिलन सबवे, किंग सर्कल, चेंबूर आदी पाणी साचणार्‍या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जाळ्या लावल्या जाणार आहेत. एका मॅनहोलच्या जाळीसाठी सात ते आठ हजार रुपये खर्च येणार आहे. अशी एक लाख मेनहोलचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पावसापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मॅनहॉलमधील दुर्घटनांमुळे कार्यवाही
1मागील मुसळधार पावसात पोटविकारतज्ज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलने बळी घेतला. या दुर्घटनेनंतर पालिकेच्या निष्काळजीपणा समोर आला. सर्व क्षेत्रातून प्रशासनावर टीकेची झोड उठली. यानंतर अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व मॅनहोलना जाळी लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यापुढे अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी पालिकेने मुंबईतील सर्व मॅनहोलना वेगळ्या आकाराची जाळी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

2 मॅनहोलच्या झाकणाच्या 3.5 इंच खाली जाळी बसवली जाणार आहे. कितीही पाऊस झाला तरी अशी घटना घडणार नाही, अशा प्रकारची जाळी असेल. शहरात एक लाखाहून अधिक सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे नाले आहेत. सध्या पूर परिस्थिती व पाण्याचा निचरा न होणार्‍या ठिकाणी या जाळ्या लावल्या जाणार आहेत.