मुंबई : मुंबईमध्ये म्हाडाच्या १ हजार ३८४ घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरांसाठीची ऑनलाईन नोंदणी सोमवार दुपारी २ वाजल्यापासून सुरू झाली असून १० डिसेंबर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १६ डिसेंबरला वांद्रे (पू.) येथील म्हाडा मुख्यालयात घरांची लॉटरी निघणार आहे.
मुंबईत आपले हक्काचे घर असावे यासाठी सर्वसामान्यांचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष लागून असते. म्हाडाने मुंबईकरांना दिवाळीभेट दिली असून मुंबई मंडळाच्या लॉटरीची घोषणा केली. लॉटरीसाठीची पात्रता, निकष, ऑनलाईन अर्ज आदी लॉटरी संदर्भातील सूचनांसाठी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ६३, अल्प उत्पन्न गटासाठी ९२६, मध्यम उत्पन्न गटासाठी २०१ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १९४ घरांचा समावेश आहे. बांधकाम चालू असलेली १ हजार ११२ घरे असून २७२ विखुरलेली घरे आहेत. यांपैकी ‘रेरा’ प्रमाणपत्र प्राप्त १ हजार ११२ घरे, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त २६३ घरे आणि भोगवटा कार्यवाही प्रगतीपथावर असेली ९ घरे आहेत.