मुंबई: मुंबईत रेल्वेच्या हद्दीत सुमारे 80 हेक्टर एवढ्या प्रचंड मोठ्या भूभागावर असणार्या सुमारे 12 लाख झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विमानतळाप्रमाणे जॉईंन्टवेन्चर करून या झोपड्यांचा पुनर्विकास एसआरए मार्फत करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मुंबईत मध्यरेल्वेच्या हद्दीत 37.25 हेक्टरवर झोपड्या असून, पश्चिम रेल्वेच्या 41.2 हेक्टर एवढा भूभाग झोपड्यांनी व्यापलेला आहे. यांच्यासाठी पुनर्विकासाची योजना नव्हती. या रहिवाश्यांनादेखील हक्काचे घर द्यावे व त्यासाठी स्वतंत्र पुनर्विकास योजना तयार करावी, अशी मागणी गेली दोन वर्षे मुंबई भाजप तर्फे आमदार अॅड. आशिष शेलार करत होते. याबाबत आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दोन वेळा दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यावेळी त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती.
आज याबाबतची उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला दोन्ही रेल्वेचे जनरल मॅनेजर, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक, नगरविकास, हौसिंग, एसआरए या विभागाचे मुख्य सचिव यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, मनिषा चौधरी, नगरसेविका उज्ज्वला मोडक आणि शिवकुमार झा उपस्थित होते. या बैठकीत आशिष शेलार यांनी सर्वांना घर ही भाजप सरकारची योजना असून रेल्वे हद्दीतील झोपड्यांना एसआरए योजना लागू नाही. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याकडे त्यांनी समितीचे लक्ष वेधले.
या झोपड्यांसाठी विमानतळावरील झोपड्यांप्रमाणे रेल्वे आणि एसआरए यांचे जॉईंन्टवेन्चर करून पुनर्विकासाची योजना तयार करण्यात यावी, याला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच याबाबतचा प्रस्ताव लिखित स्वरूपात रेल्वेला तत्काळ पाठवण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत संबंधित अधिकार्यांना दिले. त्यानुसार हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे हा प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ रेल्वे बोर्डासमोर मंजुरीला ठेवण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
दरम्यान, गेली दोन वर्षांहून अधिक काळ या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करत होतो, आज रेल्वेच्या हद्दीत राहणार्या सामान्य मुंबईकराला हक्काचे घर मिळावे या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्वतः याला मंजुरी देऊन रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.