मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे

0

मुंबई | भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतंत्र वीरांसाठी प्रेरणादायी ठरलेले आणि प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत आता मुंबईतील शाळांमध्ये सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव आज पालिकेच्या सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. यानुसार सोमवार आणि शुक्रवारी मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गाणे सक्तीचे होणार आहे.

प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती आणि देशप्रेम जागृत करण्यामध्ये ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे अढळ स्थान आहे. त्यामुळे देशाच्या भावी पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना प्रबळ करण्यासाठी शाळांमध्ये राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करावी अशी ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी मांडली होती. भावी पिढीमध्ये देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत रहावी यासाठी महापालिकेच्या सर्व शाळा आणि महापालिका हद्दीतील सर्व अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा वंदे मातरम राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करावी अशी मागणी पटेल यांनी केली. यावर सभागृहात बहुमताने या ठरावाच्या सुचनेला मंजुरी मिळाली. या प्रस्तावावरील पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

सपाच्या नगरसेवकांचा सभात्याग
वंदे मातरम राष्ट्रीय गीत मुंबईतील शाळांमध्ये म्हणण्यास सक्ती करू नये अशी मागणी करीत समाजवादी पार्टी, एमआयएम आणि विरोधी पक्षाच्या एका मुस्लीम नगरसेवकाने या प्रस्तावाला विरोध करीत सभा त्याग केला. मात्र हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. यामुळे संतापलेल्या सपा, एमआयएम आणि विरोधी पक्षाच्या एका मुस्लीम नगरसेवकाने सभात्याग केला.

चेन्नई उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा सोमवारी किंवा शुक्रवारी वंदे मातरम म्हणावे असा आदेश दिला आहे. याला अनुसरून पालिकेच्या सर्व वैधानिक समित्या, प्रभाग समित्या आणि विशेष समित्यांच्या सुरुवातीला वंदे मातरम गाण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान या आधीही १९९८ साली शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक पराग चव्हाण यांनी वंदे मातरम पालिका शाळांमधून सक्तीचे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय देताना भारतीय राज्य घटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याविरुद्ध असल्याने अशी सक्ती करता येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यावेळीही वंदे मातरम ऐच्छिक असल्याचा अभिप्राय तत्कालीन आयुक्तांनी दिला आहे. त्यानंतर भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे यांनीही सूर्य नमस्कार पालिका शाळांमधून सक्तीचे करण्याची ठरावाची सूचना मांडली असता त्यालाही मनसेसह विरोधी पक्षांनी विरोध केला होता. या ठरावाच्या सुचनेवरही आयुक्तांकडून अद्याप अभिप्राय देण्यात आलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा भाजपाकडून वंदे मातरमची सक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आयुक्त काय अभिप्राय देतात यावर पुढील अंमलबजावनी अवलंबून आहे.