मुंबई: कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचे बोलले जात होते. नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. मुंबईतील शाळा सुरु होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने यावर्षी तरी मुंबईतील शाळा उघडणार नाही. ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता पुढच्या वर्षीच शाळा सुरु होतील.
खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील शाळा पुढच्या वर्षीच सुरु होतील असे सांगितले आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले, तरी मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. शाळांबाबत राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच वेगळा आदेश काढला होता. मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असे आदेश दिले आहेत.