मुंबईतील स्कायवॉकचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट

0

मुंबई । मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकचे ऑडिट एमएमआरडीएने करावे, यासाठी महापालिका प्राधिकरणाला पत्रव्यवहार करणार आहे. मात्र, एमएमआरडीएकडून ऑडिट करण्यास नकार आल्यास ऑडिटचे काम महापालिका स्वत: करेल, त्यासाठी निविदा काढण्यात येतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी पूल व स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. त्यांचे परिरक्षण न केल्याने काही पूल धोकादायक बनले आहेत.

तर काहींवर गर्दुल्ले, भिकारी, तृतीयपंथीयांनी अड्डा बनवला आहे. गेल्या काही महिन्यांत दहिसर येथील स्कायवॉक पुलाचा काही भाग अचानक कोसळला. यात अनेकजण जखमी झाले. मुंबई महापालिकेने ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शहर, पूर्व उपनगर, पश्‍चिम उपनगर येथील लहान-मोठ्या पादचारी पूल व स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली होती. या सूचनेला 8 मे 2017 रोजी महासभेने मंजुरी दिली. महापालिकेने यावर अभिप्राय देताना, पालिकेने आपल्या अखत्यारितील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे प्रस्तावित आहेत. शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरात एक या प्रमाणे तीन सल्लागारांची निवड केली आहे.

तर एमएमआरडीएने 2010 ते 2013 या कालावधीत बांधलेले स्कायवॉक 2015 मध्ये पालिकेला हस्तांतरित केल्याने त्यांचे ऑडिट करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. त्यामुळे त्यांनी पुलांचे लवकरच ऑडिट करावे, अशी सूचना पालिका आयुक्त अजोय मेहता हे प्राधिकरणाला पत्राद्वारे करणार आहेत. मात्र, एमएमआरडीएने ऑडिट करण्यास नकार दिल्यास ऑडिटचे काम महापालिका करेल. त्यासाठी निविदाही काढण्यात येतील, असे आयुक्तांनी अभिप्रायात नमूद केले आहे.